कोल्हापुरात लवकरच पोलिस आयुक्तालय - सतीश माथूर

कोल्हापुरात लवकरच पोलिस आयुक्तालय - सतीश माथूर

कोल्हापूर - "पोलिस आयुक्तालयाबाबत चार ते पाच प्रस्ताव शासनाकडे दाखल झाले आहेत. त्यात कोल्हापूरच्या आयुक्तालयाचा प्रस्तावाचाही समावेश आहे. या प्रस्तावावर शासनाकडून सकारात्मक निर्णय होण्यासारखे वातावरण आहे. त्यामुळे लवकरच कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय सुरू होईल,' असा विश्‍वास राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी व्यक्त केला. 

ध्वजस्तंभ आणि पोलिस कल्याण निधीच्या कार्यक्रमानिमित्त ते दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यूथ पार्लमेंटच्या कार्यक्रमानिमित्त आले असता केशवराव भोसले नाट्यगृहात पत्रकारांशी ते बोलत होते. 

तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. सुखविंदरसिंग यांनी कोल्हापुरात पोलिस आयुक्तालयाची गरज का आहे? याचा परिपूर्ण प्रस्ताव पाठवला होता, मात्र त्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक यशस्वी यादव यांनी कोल्हापुरात पोलिस आयुक्तालयाची गरज नसल्याचे शेरा पाठविला होता. त्यामुळे आयुक्तालयाच्या प्रस्तावाला खो बसला. गेली अनेक वर्षे याबाबत पाठपुरावा करूनही कोल्हापुराला न्याय का मिळत नाही, याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर पोलिस महासंचालक माथूर म्हणाले, ""पोलिस मुख्यालयाबाबत राज्यातून चार ते पाच प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाकडे प्राप्त झाले. या प्रस्तावाची आवश्‍यक ती पूर्तता करून ते मंजुरीसाठी शासनाकडे पाठवले आहेत. यात कोल्हापूरच्याही प्रस्तावाचा समावेश आहे. शासनाकडून या प्रस्तावाची निश्‍चित दखल घेतली जाईल, असे पोषक वातावरण आहे. शासनाने मंजुरी दिल्यास लवकरच कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय साकारेल,'' असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

राज्यातील गुन्हे सिद्धता प्रमाण वाढविण्याबाबत धोरणाबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर माथूर म्हणाले, ""जोपर्यंत आरोपीला शिक्षा होऊन तो कारागृहात जात नाही. तोपर्यंत गुन्ह्याची सिद्धता झाली, असे म्हणता येत नाही. एकाद्या गुन्ह्याचा घाई गडबडीने तपास करून डोक्‍यावरील ओझे दूर करण्याचा प्रयत्न तपास अधिकाऱ्याने केला, तर तपासात अनेक त्रुटी राहू शकतात. राज्याच्या गुन्हे सिद्धता प्रमाण हे 58 टक्के इतके समाधानकारक आहे. त्यात आणखी वाढ कशी होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहे. तपासातीली त्रुटीचा फायदा आरोपीला होतो. ते टाळण्यासाठी पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना आवश्‍यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तपास कसा करायचा, भक्कम पुरावे कसे गोळा करायचे, सायबर सेलचा कशा पद्धतीने वापर करायचा, याबाबतही मार्गदर्शन दिले जाणार आहे. किचकट गुन्ह्यात प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले कौशल्य व अनुभवाची मदत सहकाऱ्यांना करावी.'' अशा सूचनाही देण्यात आल्याचे सांगितले. 

आयुक्तालयाचे फायदे 
कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यास कोल्हापूर, इचलकरंजीसारखी मोठी शहरे यासह परिसरातील जिल्ह्यांमुळे लोकसंख्येचा निकष पूर्ण होऊ शकतो. कोल्हापूरसह परिसरातील जिल्ह्यांमध्ये टोळीयुद्ध, खून, चेन स्नॅचिंग, सायबर क्राइमसह आर्थिक गुन्ह्यांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. पोलिस आयुक्त व अन्य तालुक्‍यांसाठी पोलिस अधीक्षक ही दोन पदे तयार होऊ शकतात. त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस संख्याबळ उपलब्ध होऊ शकते. शहर व ग्रामीण भागातील पोलिस प्रशासनाचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे पोलिस दलावरील ताणही कमी होऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com