एकमेकांच्या हालचालींवर ‘पहारा’

एकमेकांच्या हालचालींवर ‘पहारा’

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या सोमवारी (ता. ३) होत असलेल्या विषय समिती सभापतिपदांच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने निर्णय घेतल्यामुळे सभापतिपदांच्या निवडणुकीतही कमालीची चुरस निर्माण झाली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतील संख्याबळात फरक पडू नये यासाठी दोन्ही आघाड्यांकडून सावधानता बाळगण्यात येत असून, एकमेकांच्या हालचालींवर करडी नजर ठेवून आहेत.

दरम्यान, भाजपने आपले सर्व सदस्य आज सहलीवर पाठविले आहेत. भाजप आघाडीच्या घटक पक्षांची समितीच्या वाटपाबाबत उद्या (ता.२) बैठक होण्याची शक्‍यता आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींच्या निवडी आजपर्यंत बिनविरोध झाल्या होत्या. या वेळी प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत कोणाकडे बहुमत आहे, हे स्पष्ट होते. त्याप्रमाणे अध्यक्ष निवडीत भाजप आघाडीने बाजी मारत बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे सोमवारी होणारी सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा होती, पण काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने सभापतिपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर करून आपले सदस्य दोन दिवसांपूर्वीच सहलीवर पाठविले. सहलीवर पाठवत असताना त्यांनी अध्यक्ष निवडीत असणारे २८ सदस्यांचे संख्याबळ २ ने वाढल्याचे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या सदस्यांची संख्या ३० वर गेल्याचा दावा केला. त्यामुळे भाजप आघाडीत गडबड सुरू झाली. त्यांनीही आपले सदस्य बाहेर पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सकाळी सर्व सदस्य शिरोली येथून रवाना झाले.

सध्या चार समिती आहेत आणि भाजपमध्ये असलेल्या घटक पक्ष व आघाड्यांची संख्या पाच आहे. समितीच्या वाटपाबाबत अद्याप त्यांची अधिकृतपणे चर्चा झाली नसल्याचे समजते. उद्या (ता.२) आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत समितीच्या वाटपाबाबत चर्चा होणार आहे. उमेदवार ठरविण्याचे अधिकार मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या त्या आघाडीच्या नेत्यांना दिले आहेत. त्यांनी  पाकिटातून नाव द्यायचे आहे. सध्याच्या पदांची संख्या पाहता एका आघाडीला या वेळी थांबावे लागणार आहे. थांबण्याची वेळ सहाजिकच घरची आघाडी म्हणून ज्या आघाडीकडे पाहिले जाते, त्या ताराराणी आघाडीवरच येण्याची शक्‍यता आहे. बांधकाम समितीबाबत दोन आघाड्या आग्रही आहेत, असे असले तरी जनसुराज्य शक्‍ती पक्षाला हे पद मिळण्याची शक्‍यता आहे. उद्या रात्रीपर्यंत आघाड्यांचे चित्र स्पष्ट होईल त्यानंतरच उमेदवार निश्‍चित होतील.

काँग्रेसचा व्हिप
काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते मात्र आपल्या सदस्यांची संख्या कमी होणार नाही, याची दक्षता घेत आहेत. सभापतिपदाच्या निवडीत ते सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. उमेदवार निश्‍चितीसाठी त्यांचीही उद्याच (ता.२) बैठक होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, काँग्रेसच्या सदस्यांनी सभापती निवडीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारास मतदान करण्याबाबत काँग्रेसचे गटनेते व माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी काँग्रेसच्या चौदा सदस्यांसाठी व्हिप जारी केला आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी काँग्रेसचे काही सदस्य गैरहजर राहिले होते. त्यावेळी त्यांच्यावर काही कारवाई झाली झाली नव्हती. पण सभापती निवडीत जर तसे काही झाले तर निश्‍चित कारवाई केली जाणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com