देशसेवेत 'आर्मड्‌ कोअर'चे योगदान अतुलनीय - प्रणव मुखर्जी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

नगर - 'देशाच्या संरक्षणासाठी "आर्मड्‌ कोअर सेंटर अँड स्कूल'ची (एसीसी अँड एस) कामगिरी अतुलनीय आहे. या संस्थेचा इतिहास गौरवशाली, देदीप्यमान आहे. देश संरक्षणासाठी या संस्थेचा त्याग समर्पण भावनेतून आहे,'' अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज "एसीसी अँड एस'चे कौतुक केले.

नगर - 'देशाच्या संरक्षणासाठी "आर्मड्‌ कोअर सेंटर अँड स्कूल'ची (एसीसी अँड एस) कामगिरी अतुलनीय आहे. या संस्थेचा इतिहास गौरवशाली, देदीप्यमान आहे. देश संरक्षणासाठी या संस्थेचा त्याग समर्पण भावनेतून आहे,'' अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज "एसीसी अँड एस'चे कौतुक केले.

राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते आज "आर्मड्‌ कोअर सेंटर व स्कूल'ला (एसीसी अँड एस) आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान म्हणून ध्वज प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते "एसीसी अँड एस'चे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी हा सन्मान स्वीकारला. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एम. हैरिज, लष्कराच्या प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, पालकमंत्री राम शिंदे, महापौर सुरेखा कदम, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी अनिल कवडे आदींसह विविध वरिष्ठ लष्करी अधिकारी या वेळी उपस्थित होते.

मुखर्जी म्हणाले, 'आर्मड्‌ कोअर सेंटर 1948 पासून देशसेवेत समर्पित भावनेने काम करत आहे. त्यासाठीचा त्यांचा त्याग, समर्पण, व्यावसायिक कौशल्य आणि नि:स्वार्थ सेवेचा आदर्श त्यांनी प्रस्तुत केला आहे. शांतताप्रिय देश म्हणून राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय ऐक्‍य कायम ठेवण्यासाठी आपल्या क्षमतेचा उत्तम रीतीने या संस्थेने उपयोग केला. नव्या आव्हानांना तोंड देत "कवचित कोअर' भविष्यातही गौरवशाली परंपरा पुढे नेण्यात यशस्वी होईल. संस्थेत दिल्या जाणाऱ्या अत्युच्च दर्जाच्या प्रशिक्षणामुळे देशाने युद्धात उत्तम कामगिरी बजावली आहे. समर्पण आणि कठीण परिश्रमाच्या बळावर "सेंटर ऑफ एक्‍सलन्स'ची पात्रता "एसीसी अँड एस'ने मिळविली.''

या वेळी झालेल्या पथसंचलनाचे नेतृत्व ब्रिगेडिअर संदीप झुंझा यांनी केले. संचलनात लष्कराचे घोड दलातील अश्व, रणगाडा पथक आणि संचलन करणाऱ्या जवानांनी लक्ष वेधून घेतले. संचलनाच्या सुरवातीला "भीष्म' व नंतर "अर्जुन' रणगाडा सहभागी झाला होता. त्यावर सन्मानप्राप्त ध्वज घेऊन कर्नल सुनील राजदेव यांनी शानदार संचलन केले. सुखोई विमान आणि चेतक हेलिकॉप्टरने दिलेली सलामी लक्षवेधी ठरली. डाक विभागामार्फत तयार केलेल्या "फर्स्ट डे कवर'चे अनावरण या वेळी राष्ट्रपतींच्या हस्ते झाले.

ध्वज प्रदान सोहळ्यानंतर राष्ट्रपती मुखर्जी यांनी ट्रेनिंग स्कूल व परिसरातील प्रदर्शनाला भेट दिली. "कवचित कोअर सेंटर' आणि स्कूलला हा सन्मान मॅकेनाइज्ड युद्ध कौशल्य संस्थेच्या अग्रदूतच्या रूपात आपल्या उत्कृष्ट आणि कौतुकास्पद कामगिरीसाठी त्यांनी प्रदान केला.
देशातील सैनिक आणि मित्रराष्ट्राच्या सैनिकांना उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था जगभर प्रसिद्ध आहे. "कवचित कोअर'च्या पराक्रमी घोड दलाला साहसपूर्ण कामगिरीसाठी आतापर्यंत दोन व्हिक्‍टोरिया क्रॉस, दोन परमवीरचक्र, 16 महावीरचक्र आणि 52 वीरचक्रांनी सन्मानित करण्यात आले आहे.