अन्‌ "पब्लिक स्कूल झाले "अझहर'मय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - मोहम्मद अझरुद्दीनचे आगमन होताच "अझहर, अझहर...' असा जल्लोष, त्याने अभिवादन करताच विद्यार्थ्यांचा ओसंडून वाहिलेला उत्साह अशा वातावरणात कोल्हापूर पब्लिक स्कूल आज क्रिकेटमय झाले. आंतरराष्ट्रीय खेळाडूबरोबर क्रिकेटचे धडे गिरवताना खेळाडूंच्याही आनंदालाही पारावर उरला नाही. खेळ खेळाच; पण अभ्यासही तितकाच महत्त्वाचा असून शिक्षणामुळेच माणूस परिपूर्ण होतो, असा कानमंत्र त्याने दिला. कोल्हापुरी स्वागताने अझरुद्दीनही भारावून गेला. 

कोल्हापूर - मोहम्मद अझरुद्दीनचे आगमन होताच "अझहर, अझहर...' असा जल्लोष, त्याने अभिवादन करताच विद्यार्थ्यांचा ओसंडून वाहिलेला उत्साह अशा वातावरणात कोल्हापूर पब्लिक स्कूल आज क्रिकेटमय झाले. आंतरराष्ट्रीय खेळाडूबरोबर क्रिकेटचे धडे गिरवताना खेळाडूंच्याही आनंदालाही पारावर उरला नाही. खेळ खेळाच; पण अभ्यासही तितकाच महत्त्वाचा असून शिक्षणामुळेच माणूस परिपूर्ण होतो, असा कानमंत्र त्याने दिला. कोल्हापुरी स्वागताने अझरुद्दीनही भारावून गेला. 

आर. एल. फौंडेशनच्या अकाया क्रिकेट ऍकॅडमीचे उदघाटन अझरुद्दीनच्या हस्ते झाले. भारतीय संघाच्या माजी कर्णधाराशी संवादाची संधी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली. एका बाजूला विद्यार्थी आणि दुसऱ्या बाजूला पालकांसाठी आसनव्यवस्था होती. पायघड्यांनी मैदान सकाळपासूनच सजले होते. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी ड्रेसकोडमध्ये होते. हॉकी खेळाडूंचा उत्साह वेगळा होता. त्यांचा सत्कार अझरुद्दीनच्या हस्ते होणार होता. सकाळी सव्वादहाच्या सुमारास अझरुद्दीनचे आगमन होताच विद्यार्थ्यांत चैतन्याचे वातावरण पसरले. कोल्हापुरी फेटा बांधलेला अझरुद्दीन अधिक उठावदार दिसत होता. संचलनाद्वारे त्याचे व्यासपीठापर्यंत स्वागत झाले. फौंडेशनचे सर्वेसर्वा किशोर तावडे, शोभा तावडे, सुजय तावडे यांच्यासह समिती सदस्यांनी त्याचे स्वागत केले. अझरुद्दीनच्या किक्रेट कारकिर्दीवर लघुपट दाखविला गेला. त्याचा प्रत्येक फटक्‍याला विद्यार्थ्यांनी टाळ्यांची दाद दिली. 

शाळेच्या हॉकी संघासह आंतरराष्ट्रीय पंच रमा पोतनीस यांचा अझरुद्दीनच्या हस्ते सत्कार झाला. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर अझरुद्दीन बोलण्यासाठी माईकच्या दिशेने गेला आणि त्याच वेळी "त्रिदेव' चित्रपटातील "ओए ओए' ही धून वाजली आणि उपस्थित सर्वच हास्यकल्लोळात बुडाले. अझरुद्दीननेही त्यास दाद दिली. 

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तो म्हणाला, ""एखाद्या क्षेत्रात करिअर करण्याचा निश्‍चय केला की, त्यास कठोर परिश्रमाची जोड द्यावी लागते. त्याशिवाय कामगिरीत सातत्य ठेवू शकत नाही. खेळासोबत शिक्षण महत्त्वाचे आहे. चांगले काय आणि वाईट काय हे समजायचे असेल तर शिक्षण महत्त्वाचे आहे. तुम्ही एखाद्या क्षेत्रात महान आहात; मात्र तुमच्याकडे शिक्षण नसेल तर त्या महानपणाचा काही उपयोग नाही. क्रिकेट असो वा अन्य कुठलाही खेळ, मुळात त्यासंबंधीचे कौशल्य अंगी पाहिजे. ग्लॅमर आहे म्हणून आणि आवड आहे म्हणून करिअर होऊ शकत नाही. मला माझ्या आजोबांपासून प्रेरणा मिळाली. वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात असताना क्रिकेटमुळे बॅंकेत नोकरीची संधी चालून आली. आजोबांनी यापेक्षा शिक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले की कुठे घेऊन जायचे ते जा, असा सल्ला बॅंकवाल्यांना दिला. मुलांकडून आई-वडिलांना खूप अपेक्षा असतात. ते तुमच्यासाठी खूप कष्ट घेतात. त्यामुळे पालकांचा आदर करण्यास शिका. ऍकॅडमीच्या निमित्ताने महाराष्ट्राशी असलेला जिव्हाळा अधिक वाढल्याचे त्याने नमूद केले. 

ऍकॅडमीच्या प्रमुख शोभा तावडे यांनी तालुक्‍याच्या ठिकाणी चांगले क्रिकेटपटू आहेत. त्यांना व्यासपीठ मिळाले की, मुले भारतीय संघात स्थान मिळवू शकतात. पालकांचा क्रिकेटकडे अधिक कल आहे. त्यामुळे आर. एल. फौंडेशनने ऍकॅडमी सुरू केल्याचे सांगितले. 

या वेळी सचिन झंवर, भरत जाधव, विजय मेनन, प्राचार्या शुभांगी पोवार, दीपक देसाई, विभा जाधव आदी उपस्थित होते. 

खेळांडूसोबत प्रॅक्‍टिस 
मार्गदर्शनानंतर अझरुद्दीन प्रत्यक्ष मैदानावर उतरला. कधी गोलंदाजी तर कधी फलंदाजी करत कौशल्य दाखवून दिले. "स्वयम' शाळेच्या संतोष डिसले याने अझहरला गोलंदाजी केली. त्यावेळी चेंडू टाकताना हात कसा फिरायला हवा याचे धडे अझहरने दिले. नंतर शाळेच्या क्रिकेट खेळांडूसोबत अझहरने नेट प्रॅक्‍टिस केली. 

Web Title: public school kolhapur