पुण्यातील विद्यार्थ्यांचे कोल्हापुरात वाहतूक सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

कोल्हापूर : बेशिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या कोल्हापूरच्या वाहतुकीचे दुखणे कमी करण्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या "टाउन प्लॅनिंग' शाखेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. महालक्ष्मी मंदिराजवळच्या सुमारे तीन किलोमीटर परिसरातील सर्वेक्षण ते करीत आहेत. त्यांचे सर्वेक्षण महत्त्वाच्या आठ मुद्द्यांवर सुरू आहे. एकूण 22 विद्यार्थ्यांचे पथक हे काम करीत आहे. याबाबतचा अहवाल ते साधारण दोन महिन्यांत पोलिसांना सादर करणार आहेत.

रस्त्यांची क्षमता आणि प्रत्यक्षातील वाहतूक, पादचाऱ्यांसाठी पदपथ त्यांची अवस्था काय, सार्वजनिक वाहतुकीची परिस्थिती, अंतर्गत प्रवासी वाहतूक (रिक्षा), वाहनतळांची सोय व स्थिती या मुद्यांच्या आधारे सर्वेक्षण केले जात आहे. त्याचबरोबर या परिसरातील प्रत्येक घराघरांत जाऊन त्यांच्याकडील वाहनांची माहिती घेतली जाणार आहे.

""आमचे महाविद्यालय नियोजनासाठीच काम करते. महालक्ष्मी मंदिर परिसरातील तीन किलोमीटरच्या परिसराचे सर्वेक्षण केले जाईल. आमच्या सर्वेक्षणाचा उपयोग वाहतुकीला शिस्त लावणारा नक्कीच ठरेल,'' असा विश्‍वास प्रा. राहुल शुक्‍ला यांनी व्यक्त केला आहे.