पावसाची दमदार सलामी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

सातारा, कोरेगाव, पाटण तालुक्‍यांत हजेरी
सातारा - तीव्र उन्हाळ्यामुळे अंगाच्या लाहीलाही होत असताना आज वरुणराजाने सातारकरांवर चांगलीच कृपादृष्टी दाखवली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाने दमदार "एंट्री' केली.

सातारा, कोरेगाव, पाटण तालुक्‍यांत हजेरी
सातारा - तीव्र उन्हाळ्यामुळे अंगाच्या लाहीलाही होत असताना आज वरुणराजाने सातारकरांवर चांगलीच कृपादृष्टी दाखवली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाने दमदार "एंट्री' केली.

दुपारपासूनच ढगाळ वातावरण बनल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पाऊस पडण्याची आशा लागली होती. अखेर, सायंकाळी सात वाजल्यापासून काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी हलका शिडकावा सुरू झाल्याने गारवा मिळाला.

सातारा तालुक्‍यातील अंगापूर, वर्णे, जिहे, चिंचणेर, निगडी, कामेरी, अपशिंगे, देशमुखनगर, खोजेवाडी, वेणेगाव, माजगाव, शेरेवाडी, मापरवाडी, आसनगाव, भाटमरळी, कुसवडे, परळी परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पाटण तालुक्‍यात तळमावले, तारळे परिसरात विजांच्या कडकडाटासह तासभर पाऊस झाला. कोरेगाव शहर व परिसरात सायंकाळी मेघगर्जनेसह चांगला पाऊस झाला. जळगाव येथे गारांचा वर्षाव झाला. माण, खटाव तालुक्‍यांत ढगाळ वातावरण झाले होते. गोंदवले बुद्रुकसह अन्य ठिकाणी विजा चमकत होत्या. पाऊस पडत असतानाच हलक्‍या ते मध्यम वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविणारा हवामान खात्याचा मेसेज जिल्हाधिकाऱ्यांनी व्हॉट्‌सऍपवर व्हायरल केला होता.

गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याचे कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. दुपारच्या वेळेस येथील रस्तेही ओस पडत असत, इतका उन्हाचा तडाका होता. गारव्यासाठी एसी, फॅन्स, कुलर यांचा घर, कार्यालयात वापर वाढला आहे. शिवाय, शारीरिक गारवा मिळविण्यासाठी थंड पेयांनाही मागणी वाढली आहे. अशातच वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार विजांच्या कडकडाटासह पावसाचा शिडकावा सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत विजांचा कडाकडाट सुरू होता. या दरम्यान सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने सातारकरांची दैनाही झाली.

आंब्यांना फटका
शेतात काढून टाकलेली रब्बी ज्वारी, हरभरा व गव्हाच्या पिकांचे या पावसामुळे नुकसान होण्याची शक्‍यता आहे, तसेच यंदा आंब्याला बऱ्यापैकी फलधारणा झालेली आहे. त्यांची गळती होण्याचा धोका आहे. मात्र, भुईमुगासह अन्य उन्हाळी पिकांना तो पोषक ठरला आहे.

Web Title: rain in satara