अवकाळी पावसाची सोलापुरात हजेरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

सोलापूर - सोलापूर शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. रिमझिम व किरकोळ पाऊस साधारणतः अर्धा तास होता. गेल्या महिन्यापासून कडक उन्हाने होरपळणाऱ्या नागरिकांना या अवकाळी पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास अक्कलकोट तालुक्‍यासह इतर तालुक्‍यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उन्हाचा चटका आज दुपारपर्यंत नेहमीप्रमाणे जाणवत होता. दुपारी चारनंतर वातावरण ढगाळ झाले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाची रिमझिम सुरू झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत सोलापूर शहर व परिसरात 0.1 मिलीमीटर पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. आज सोलापुरात 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.