जे जमत नाही, ते पहिल्यांदा स्वतः "ट्राय' करा...! - राजेश मापूसकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

कोल्हापूर - 'ऍड फिल्म्स आणि नंतर फिल्म इंडस्ट्रीतही संघर्ष करीत यशाचे अनेक टप्पे पार केले... "व्हेंटिलेटर'ची कथा सुचताच ती लिहूनही काढली... लेखन आपलं काम नाही, म्हणून मग तीच कथा पटकथा आणि संवादासाठी दुसऱ्या लेखकांकडे दिली; पण ती मनासारखी होत नव्हती.

कोल्हापूर - 'ऍड फिल्म्स आणि नंतर फिल्म इंडस्ट्रीतही संघर्ष करीत यशाचे अनेक टप्पे पार केले... "व्हेंटिलेटर'ची कथा सुचताच ती लिहूनही काढली... लेखन आपलं काम नाही, म्हणून मग तीच कथा पटकथा आणि संवादासाठी दुसऱ्या लेखकांकडे दिली; पण ती मनासारखी होत नव्हती.

अखेर जे जमत नाही, ते स्वतःच ट्राय केलं तर काय हरकत आहे, असा प्रश्‍न स्वतःच्या मनाला विचारला आणि पटकथा-संवादही मीच लिहिले... "व्हेंटिलेटर' यशस्वी झाला आणि आता इथून पुढे जे काही चित्रपट करेन ते मीच लिहीन, असा संकल्प केला आहे...'' बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक राजेश मापूसकर संवाद साधत होते आणि फिल्म इंडस्ट्रीतील विविध अनुभवांची शिदोरी उलगडताना तरुणाईसाठी विविध टीप्सही मिळत होत्या.

सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठ आयोजित डीवायपी ग्रुप प्रस्तुत "ऊर्जा ः संवाद ध्येयवेड्यांशी' या कार्यक्रमांतर्गत आज पाचवे पुष्प त्यांनी गुंफले. योगेश देशपांडे (पुणे) यांनी हा संवाद खुलवला.

"नमस्कार कोल्हापूरकर' अशी साद घालतच मापूसकर यांनी संवादाला प्रारंभ केला. त्यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन. साहजिकच त्यांचे सारे बालपण समुद्रकिनारी सरले. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर वडिलांनी पुढील शिक्षणासाठी त्यांना मुंबईतील एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. "सीए' व्हावं, अशी वडिलांची अपेक्षा म्हणून कॉमर्सला प्रवेश घेतला. इंग्रजी भाषेबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असतानाही पदवीपर्यंतची पाच वर्षे कशीबशी रडतखडत काढली आणि 36 टक्‍क्‍यांनी ते "बीकॉम' झाले. इथपर्यंतचा सारा प्रवास उलगडताना त्यांनी सिनेमा थिएटर चालवण्यासह गावाकडच्या विविध आठवणी, भेटलेली गर्लफ्रेंड, तिच्याकडून मिळालेली मोटिव्हेशन आणि इतर रंजक किस्सेही शेअर केले.
मुंबईत स्ट्रगल करत असतानाच एका ऍड फिल्मच्या निमित्ताने राजकुमार हिराणी यांच्याबरोबर मैत्री जमली आणि नंतर त्यांच्याबरोबरीनेच अनेक चित्रपट हिट केले. "मुन्नाभाई एमबीबीएस'चा प्रवास व्हाया शॉर्टफिल्म, टीव्ही मालिका असा राहिला. या दोन्ही गोष्टी शक्‍य न झाल्याने चित्रपट तयार झाला आणि तो लोकप्रिय झाला. "मुन्नाभाई'ची भूमिका सुरवातीला विवेक ओबेरॉय करणार होता. त्याला शक्‍य नसल्याने शाहरूखने भूमिका स्वीकारली; पण अखेर त्यालाही न जमल्याने अखेर ती संजय दत्त यांच्याकडे गेली, अशा अनेक आठवणीही त्यांनी सांगितल्या.

कोल्हापूर लय भारी...!
मापूसकर यांची एक काकी कोल्हापूरची. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत पूर्वी त्यांचा दौरा ठरलेला. कोल्हापुरात सलग नऊ दिवस नऊ वेळा जॅकी श्रॉफचा "हिरो' हा चित्रपट पाहिल्याची आठवणही त्यांनी सांगितली. कोल्हापूरचा दूध कट्टा आणि तांबडा-पांढरा रस्सा लय भारी, अशी प्रतिक्रियाही त्यांनी या वेळी दिली.

पासष्ट जणांचे कुटुंब
श्रीवर्धनला आमचे पासष्ट जणांचे एकत्र कुटुंब. त्यामुळे माणसांच्या गोतावळ्यात राहण्याची पहिल्यापासूनच सवय लागली. एकाच घरात अनेक व्यक्तिमत्त्वांचा अभ्यासही त्यानिमित्ताने जवळून करता आला. त्याचा फायदा "व्हेंटिलेटर'च्या वेळी झाला आणि एक उत्कृष्ट कलाकृती साकारली, असेही मापूसकर यांनी सांगितले.

यांचे विशेष सहकार्य
"डीवायपी' ग्रुप प्रस्तुत या कार्यक्रमाचे राजुरी स्टील मुख्य प्रायोजक असून, मॉडर्न होमिओपॅथी हेल्थ पार्टनर, मार्व्हलस इंजिनिअर्स, पार्थ फाउंडेशन, लक्ष्मी सेल्स, तनिष्क ज्वेलर्स, सीएमएम ऍरेना सहप्रायोजक आहेत. युनियन बॅंक बॅंकिंग पार्टनर आहे.

फेसबुकवर लाइव्ह प्रक्षेपण
ऊर्जा उपक्रमांतर्गत होणारे सर्व संवाद यंदापासून "फेसबुक'वरूनही लाइव्ह अनुभवायला मिळणार आहेत. आजपासून या लाइव्ह प्रक्षेपणाला प्रारंभ झाला असून प्रक्षेपण सुरू असतानाही या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन प्रश्‍न विचारून या संवादात सहभागी होऊ शकता. त्यासाठीची लिंक अशी -
www.facebook.com/sakalkolhapur

ठळक चौकटी
राजेश मापूसकर सांगतात...!
- इंग्रजी येत नसल्याचा न्यूनगंड काढून टाका. ज्या वेळी शिकण्याची इच्छा होईल, तेव्हापासून ती अवगत करण्यासाठी झपाटून कामाला लागा.
- पालकांनी मुलांची आवड लक्षात घेऊनच त्यांना करिअरची संधी द्यावी. आपल्या अपेक्षा पाल्यावर लादू नयेत.
- मी महिन्याला अडीच लाख मिळवत असताना ऍड फिल्मचे काम बंद केले आणि विधू विनोद चोप्रा यांच्या कंपनीत दहा हजारांची नोकरी पत्करली. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यानेच पुढे "व्हेंटिलेटर'पर्यंतचा यशस्वी प्रवास करू शकलो.
- तुम्ही कुठल्याही क्षणी करिअर बदलू शकता. जेव्हा तसे वाटेल त्या वेळी "रिस्क' घ्याच.
- जे शिकता ते भरभरून शिकण्याचा प्रयत्न करा. पुढे करिअर जरी बदलले तरी त्या शिक्षणाचा फायदा आयुष्यभर होतो.

राजुरी स्टीलचे प्रदर्शन
राजुरी स्टीलच्या वतीने लोककला केंद्रात "लेक वाचवा' या विषयावर पोस्टर प्रदर्शन भरवले असून, त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. "कन्या' राशीशिवाय राशिचक्र कसे पूर्ण होईल', "जिंकण्यासाठी हवी राणी, मग मुलगी का नको', "मुलापेक्षा मुलगी बरी, संसाराचा दिवा लावी दोन्ही दारी', "माझेच दात माझेच ओठ, मीच का घेतला नरडीचा घोट' अशा आशयाची कल्पक पोस्टर्स सर्वांनाच भुरळ घालत आहेत.

डॉ. अशोक खाडे यांच्याशी आज संवाद
सांगलीच्या मातीत जन्मलेले आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने जगभरात यशोलौकिकाचे शिलेदार ठरलेले डॉ. अशोक खाडे आज (शनिवारी) संवाद साधणार आहेत. एक अभ्यासू अभियंता म्हणून त्यांची ओळख असून "दास ऑफशोअर'ची निर्मिती, विदेशी कंपन्यांबरोबर वाटचाल करताना स्ट्रक्‍चरल डिझाईन आणि इन्फ्रास्ट्रक्‍चरमध्ये त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे ज्या शेतात मजुरी करून आईने त्यांना शिकवले, ते शेत नंतर विकत घेणारे उद्योजक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.
- स्थळ ः शिवाजी विद्यापीठ, लोककला केंद्र
- वेळ ः सायंकाळी 6 ते रात्री 8 (सर्वांना विनामूल्य प्रवेश)