‘राम जन्मला गं सखे...!’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

सांगली - ‘राम जन्मला गं सखे, राम जन्मला...!’ या ओवीने आज सांगलीकर नतमस्तक झाले. ढोल-ताशांच्या गजरात श्रीरामाचा जयजयकार करण्यात आला. शहर आणि परिसरातील विविध राम मंदिरांत मोठ्या भक्तिभावात श्रीरामनवमी साजरी करण्यात आली. धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 

शहरातील राम मंदिर चौकातील मंदिरात आज पहाटेपासून भक्तांची रिघ लागेली होती. प्रसन्न आणि भक्तिभावाने श्रीरामाची पूजा करण्यात आली. दुपारी जन्मोत्सव साजरा झाला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शहरातील प्रमुख मानल्या जाणाऱ्या राम मंदिरात हजारो भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली होती. सायंकाळपर्यंत रांगा कायम होत्या. 

कृष्णाकाठी असणाऱ्या श्रीराम टेकडी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फेही श्रीरामनवमीचा सोहळा साजरा करण्यात आला. दोन शतकांहून अधिक काळचा इतिहास या मंदिराला आहे. पूर्वी झाडाखाली असणाऱ्या मंदिराचा पाच वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गेले चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम झाले. कोल्हापूरचे दीपक भागवत यांनी श्री एकनाथ महाराज यांचे चरित्र भक्तांसमोर ठेवले. आज सकाळी १० ते दुपारी १२.३० या काळात सातारा येथील भास्कर काणे यांचे जन्मकाळाचे कीर्तन झाले. त्यानंतर जन्मोत्सव साजरा करण्यात आले. परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंदलाल मानधना, श्रीनिवास लड्डा, विजय बजाज, विजयकुमार नावंधर यांनी संयोजन केले.

राम मंदिरांच्या परिसरात भक्तांची गर्दी होत असल्याने वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त मंदिरांच्या परिसरात होता.