पावसाने तिसऱ्या दिवशी रत्नागिरीला झोडपले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

रत्नागिरी - सर्वपित्रीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या वादळी वारा व मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सर्वाधिक पाऊस संगमेश्‍वर, मंडणगडसह, खेड-दापोलीत पडला. उर्वरित तालुक्‍यांमध्ये संततधार होती. पावसामुळे उभ्या भातशेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. समुद्र खवळला होता. गुजरात, मुंबईसह परराज्यातील अनेक नौका जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांच्या आश्रयाला आल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत.

मंगळवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 114.76 मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 104.30, दापोली 153, खेड 91, गुहागर 126, चिपळूण 154, संगमेश्‍वर 101.20, रत्नागिरी 94.20, लांजा 85.20, राजापूर 123 मिमी पाऊस झाला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे शनिवारी (ता. 16) सायंकाळपासून कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपले.

 मंडणगडमधील भारजा नदीला पूर आल्याने गावांचा संपर्कही तुटला होता. दरड कोसळून चिपळुणात चिखली-पांगारी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ती चार तासाने सुरळीत करण्यात आली. शास्त्री नदीला आलेल्या पुरामुळे संगमेश्‍वर-माखजन बाजारपेठेत पाणी घुसले. मात्र व्यापाऱ्यांनी माल सुरक्षितस्थळी हलवला. भडकंबा येथील विजय पवार यांच्या घराजवळील संरक्षक भिंत कोसळली. राजापूर येथे अनुसया घाग यांच्या घराला तडे गेले आहेत.

लाटांचा जोरही अधिक आहे. उंचच उंच लाटांनी नौका समुद्रात उभ्या करणेही शक्‍य होत नव्हते. गुजरात, कर्नाटकसह मुंबईच्या अनेक नौका कोकण किनाऱ्यापासून काही अंतरावर मासेमारीसाठी आल्या होत्या. वारे वाहू लागल्यानंतर या नौका मिरकरवाडा, जयगड, नाटे आदी किनारी दाखल झाल्या. मिरकरवाडा बंदरात सुमारे पन्नास नौका आल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यांना लागणारे पाणी, आवश्‍यक साहित्य बंदरातील मच्छीमारांकडून पुरविण्यात येत होते. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा मत्स्य विभागाकडून देण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्‍यातील काजळी नदीची पाणीपातळी वाढू लागल्यानंतर तहसील प्रशासनाकडून किनाऱ्यावरील लोकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या.

गुजरातची नौका ठरली नशीबवान
वेगवान वाऱ्याच्या तडाख्यात सापडलेली गुजरात येथील मच्छीमारी नौका भरकटत शहराजवळील पंधरामाड येथे किनाऱ्याला लागली आहे. सायंकाळी स्थानिक नागरिकांनी या नौकेतील पाच खलाशांना सुखरूप बाहेर काढले. किनाऱ्याचा आधार मिळाला नसता तर ही नौका बाजूलाच असलेल्या खडकावर आदळून नुकसान झाले असते.