ओळखा आतला आवाज

ओळखा आतला आवाज

स्पर्धा असो वा वैयक्तिक जीवन, ज्यांना स्वतःचा आतला आवाज ओळखता येतो, त्यांनाच यशस्वी व सुखी जीवनाची बाराखडी गिरवता येते. जे स्वतःच्या प्रेमात पडतात, तेच स्वतःच्या ध्येयावर जिवापाड प्रेम करू शकतात. सतत स्वतःच्या निर्णयाबद्दल शंका घेणारी, स्वतःच्या क्षमतेबाबत नकारात्मक बोलणारी व्यक्ती पूर्ण क्षमतेने स्पर्धेत स्वतःला सिद्ध करूच शकत नाही. ज्यांना आतल्या सादाला प्रतिसाद देता येतो, त्यांनाच बाहेरच्या जगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येते व ते टिकवताही येते.

स्पर्धा हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. आपल्या दैनंदिन जीवनात हा शब्द आपण उठता-बसता नेहमीच वापरतो; पण अनेक तरुणांना स्पर्धेचे म्हणावे तितके गांभीर्य दिसत नाही. हेही एक सत्य आहे. जे स्पर्धेकडे गांभीर्याने पाहतात त्यातील काहीजणच जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्याची क्षमता बाळगतात. बाकीचे बहुतांश गोंधळलेलेच आढळतात. अनेक विद्यार्थ्यांना प्रचंड कष्ट करूनही येणारे अपयश अस्वस्थ करीत असते. काहींना मिळालेले पद व यश टिकवून कसे ठेवायचे, याची भीती सतावत असते. बरेच जण स्पर्धेत स्वतःला सिद्ध करता न आल्याचे मानसिक दडपण घेऊनच जगत असतात. स्पर्धेत टिकून राहण्याची क्षमता व कौशल्य असूनही हे नैराश्‍य, ही अनामिक भीती. जीवघेणी अस्वस्थता, असमाधान का बरे वाट्याला यावे? याचे कारण म्हणजे आपण स्वतःच स्वतःला ओळखायला कुठेतरी कमी पडलोय. मनाच्या खोल गाभाऱ्यातून येणारा आवाज आपल्या कान व मनापर्यंत पोचलाच नाही. हा आवाज ओळखता आला व आतल्या गाण्याच्या सुरात सूर मिसळता आला, तर नक्कीच प्रत्येकाचेच जीवनगाणे सुरेल होईल.

यामुळे काय होईल?
प्रत्येक व्यक्ती ही स्वतःचीच चांगली मित्र असते. उत्तम सल्लागार असते. स्वतःलाच स्वतःची सगळी बलस्थाने व दुर्बल स्थाने संपूर्णतः माहिती असतात. आपला आतला आवाज सतत याची जाणीव करून देत असतो. वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतो. आपण मात्र बाहेरच्या दुनियेत एवढे मश्‍गूल असतो की, हा आवाज कानावर पडूनही बऱ्याचदा आपण तो ऐकत नाही. जर वेळीच हा आवाज ओळखला तर ध्येयाची निवड करताना होणारा गोंधळ नक्की संपून जाईल. आपले प्रत्येक व्हिजन आपल्यालाच स्पष्ट दिसायला लागेल. स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धेत आपण कसे टिकू शकतो त्याचे मार्गदर्शन आपण स्वतःलाच करू शकाल. बोलण्यात, वागण्यात स्पष्टता येईल. तुमच्या उणिवा तुम्ही मान्य करायला शिकाल. स्वतःच्या क्षमतेबाबत असणारे गैरसमज विरून जातील. नैराश्‍येचे, अस्वस्थतेचे मळभ दूर होऊन मनाचे आकाश नितळ निळे बनेल. आपण आपलाच चांगला मित्र बनू शकू.

आपण हे करू शकता...  
- ज्यांना आपली आवड-निवड जाणून घ्यायची असेल, आपल्याला नक्की काय करायचे आहे हे समजत नसेल, निर्णय घेताना गोंधळ होत असेल, तर आपण आज दररोज काय काम करतो, त्याचा मनःपूर्वक अभ्यास करा. दररोजची केलेली कामे, मनात येणारे विचार एका वहीत लिहून काढा.
- स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, भविष्यातील योजना याची यादी तयार करा. आपण लिहिलेल्या इच्छा तुम्हाला स्वतःला वाटतात की, तुमच्या आवडी - निवडीवर दुसऱ्याचा प्रभाव आहे, याचा शोध घ्या.
- जर आपले विचार हे परावलंबी असतील तर स्पर्धेला तोंड देताना त्याचा सर्वाधिक त्रास तुम्हाला होणार आहे. कारण कोणत्याही स्पर्धेत स्वतंत्र विचाराचीच व्यक्ती ही यशस्वी होते. 
- आपण तयार केलेल्या यादीवरून आपल्यात काही उणिवा जाणवत असतील तर त्याचा मोकळेपणाने स्वीकार करा. त्या सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू करा.
- लक्षात ठेवा, वेळोवेळी तुमच्या डोक्‍यात येणारे विचार, एखाद्या हुशार व्यक्तीने तुमच्याबाबत मांडलेली मते, तुमची खरीखुरी आवड याच गोष्टी तुम्हाला वेळोवेळी मार्ग दाखवत असतात. स्वतःच स्वतःचा जवळचा सखा बनून या गोष्टी ऐकल्या तर नक्कीच सकारात्मक बदल पाहायला मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com