‘रयत’मध्ये आता दूरस्थ शिक्षण पद्धतीही

दिलीपकुमार चिंचकर
शनिवार, 13 मे 2017

सातारा - शहरी भागातील शाळांतील विद्यार्थ्यांना सुविधा आणि मार्गदर्शन सहज मिळून जाते; पण दुर्गम, आदिवासी आणि ग्रामीण डोंगरी भागातील विद्यार्थी त्यापासून काहिसे वंचित राहतात. त्यांनाही चांगल्या शिक्षणाच्या प्रवाहात आणता यावे, त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी रयत शिक्षण संस्थेने अद्ययावत स्टुडिओ आणि प्रक्षेपण केंद्र येथे उभारले आहे. आता ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तसेच साताऱ्याच्या कोयना जलायशयापलीकडील विद्यार्थीही या गुणवत्तेच्या कक्षेत येणार आहेत. 

संस्थेने दूरस्थ शिक्षण पद्धती अमलात आणली आहे. रयत शिक्षण संस्था स्थापन करण्यामागे अडचणींतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जावे, हा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा उद्देश होता. राज्यभर विस्तारलेली ‘रयत’ आणि संस्थेचे पदाधिकारी हाच उद्देश पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांच्या दिमतीला त्यांनी तंत्रज्ञान घेतले आहे. संस्थेच्या अनेक शाखा अतिदुर्गम भागात आहेत. सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशयापलीकडील शाळा तसेच आदिवासी भागातील माध्यमिक शाळा, आश्रमशाळांचा त्यात समावेश आहे. या मुलांना आता शासन आणि संस्थेच्या धोरणामुळे बऱ्यापैकी शैक्षणिक सुविधा मिळतात. मात्र, त्याव्यतिरिक्तचे मार्गदर्शन दुर्गमतेमुळे मिळू शकत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत काहिसे मागे पडू शकतात. तसे होऊ नये यासाठी त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी संस्थेने अद्ययावत स्टुडिओ उभारण्याचा निर्णय घेतला. डॉ. अनिल पाटील आणि सहकारी पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न केले. निधीची तरतूद करून साहित्य जमा केले. संस्थेच्या येथील मुख्य कार्यालयातील इमारतीतच हा स्टुडिओ आता आकारास आला आहे. या ठिकाणी व्याख्याने, प्रात्यक्षिके याचे लाईव्ह प्रक्षेपण, तसेच रिकॉर्डिंग प्रक्षेपित करण्याची यंत्रसामग्री आणली आहे. या रयत एज्युकेशनल चॅनेलचे उद्‌घाटन माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

रयत एज्युकेशनल चॅनेलची वैशिष्ट्ये
स्कालरशिप, स्पर्धा परीक्षा, करियर मार्गदर्शन याबाबत विविध तज्ज्ञांची व्याख्याने प्रक्षेपित करणार.
व्याख्यानांचा लाभ केव्हाही घेता यावा, यासाठी यु ट्यूबवर व्याख्याने डाउनलोड करून ठेवणार
ऐकणारे व पाहणाऱ्यांना शंका विचारता येणार
आठवड्यातून पाच दिवस निश्‍चित वेळेत प्रक्षेपण करणार
संस्थेच्या ४५० शाळा, ५० महाविद्यालयांना फोर जी इंटरनेट, एलसीडी देण्यात आले आहेत
३७ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांनाही सुविधा, सामुग्री देण्यात आली आहे  
संस्थेकडे विविध विषयांची पॉवरपॉइंट बॅंक, लॅंग्वेज बॅंक तयार