ड्रोन भारी की पोलिसांची नजर भारी...

सुधाकर काशीद
शनिवार, 15 एप्रिल 2017

कोल्हापूर शहरातील काही ठिकाणे म्हणजे बेकादेशीर वाहतुकीचे अड्डे आहेत. वर्षानुवर्षे रेटून आणि वाटाघाटीतून हे सारे चालू आहे. साऱ्या शहराला हे माहीत आहे. प्रत्येत वाहतूक पोलिसाला हे माहीत आहे.

कोल्हापूर : माळकर तिकटीला सिग्नल आहे. तेथे बारा तास दोन पोलिस असतात. त्यांच्यापासून अवघ्या पाच फुटांवर वडाप करणाऱ्या रिक्षा बिनधास्त उभ्या असतात. गेली दहा-बारा वर्षे हा प्रकार चालू आहे. एस.टी. स्टॅंडवर दाभोळकर कॉर्नरला हेच चालू आहे; पण कारवाई शून्य आहे. कारण या रिक्षावाल्यांच्या नेत्यांचा दणका मोठा आहे. पोलिसांना रोज उघड्या डोळ्याने या रिक्षा दिसतात. त्यांच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी दिसते; पण उघड्या डोळ्याने जे दिसते, त्याकडे दुर्लक्ष करत आता ड्रोनच्या साहाय्याने आकाशातून पाहणीचा मार्ग पोलिसांनी स्वीकारला आहे. 

वाहतूक व्यवस्था नव्या आखणीचा प्रयत्न म्हणून हे सारे ठीक आहे; पण कोल्हापूर शहरातील काही ठिकाणे म्हणजे बेकादेशीर वाहतुकीचे अड्डे आहेत. वर्षानुवर्षे रेटून आणि वाटाघाटीतून हे सारे चालू आहे. साऱ्या शहराला हे माहीत आहे. प्रत्येत वाहतूक पोलिसाला हे माहीत आहे. यातूनच एंट्रीची ठिकाणे निश्‍चित केली गेली आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहराची वाहतूक अवस्था ड्रोनद्वारे जरूर दिसेल; पण पोलिसांनी दिसून नसल्यासारखे केले तर ते मात्र शहराच्या दृष्टीने खूप अवघड असेल. 

लक्‍झरी बस सेवा जरूर दळणवळणाचा आवश्‍यक घटक आहे; पण भर रस्त्यात उभ्या राहणाऱ्या या बस पोलिसांना दिसत नाहीत, असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे. कारण शहर वाहतूक पोलिसांच्या क्रेनवरील मजुरांना रस्त्याकडेला अगदी कोपऱ्यात उभारलेली मोटारसायकल सहज दिसते. ही मोटारसायकल आपोआप सुरू होऊन वेगाने निघून जाईल की काय, अशा 'तत्परतेने' मोटारसायकल उचलली जाते. क्रेनवर आदळली जाते. कारण प्रती मोटारसायकल 100 रुपये कमाईचे टार्गेट पूर्ण करायचे असते; पण याच क्रेनला भर रस्त्यात असलेली लक्‍झरी बस दिसत नाही. महापालिकेसमोर अवजड वाहने थांबू नयेत, असे निर्बंध असलेल्या वेळेत थांबलेले ट्रक दिसत नाहीत. स्टॅंडजवळ रांगेत उभे असणारे रिक्षाचालक तेथेच; पण दादागिरी करून प्रवासी भरून नेणारे काही ठराविक रिक्षाचालक दिसत नाहीत. पार्किंगमध्ये नसणारी वाहने उचलण्यास हरकत नाही; पण आपल्या दारात पार्किंग नको म्हणून बहुतेक दुकानदारांनी भर रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी जाळ्या पोलिस हटवत नाहीत. उस्मानाबाद, बीड, लातूर, नगर येथून एका ट्रॅक्‍समधून 14 ते 15 जण भरून आलेले गरीब भाविक हमखास पोलिसांना दिसतात; पण शहरात यायलाच परवानगी नसलेले सहाआसनी रिक्षाचालक बिनधास्त शहरातून वाहतूक करतात. 

जाणीवपूर्वक डोळेझाक 
हे सारे पोलिसांना रोज डोळ्याने दिसते; पण तिकडे डोळेझाक केली जाते. याउलट ड्रोन उडवून पाहणीचे वेगळेपण दाखवले जाते. हे बदलणे पोलिसांना शक्‍य आहे. एका रात्रीत हे बदलेल ही अपेक्षा करणेही चूक आहे; पण आधी थेट उघड्या डोळ्याने दिसते त्यावर कारवाईची गरज आहे. ड्रोन वगैरे हा पुढचा भाग आहे. ड्रोनपेक्षा पोलिसांचा समान न्यायाने, कोणाचाही दबाव न घेता झटकाच मोठ्या ताकदीचा असणार आहे. 

सुधाकर काशीद

Web Title: Report by Sudhakar Kashid on Drone and police security