ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

सोलापूर - "मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे, मात्र हे आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता ते स्वतंत्रपणे द्यावे.' असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी केले. 

सोलापूर - "मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे, मात्र हे आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता ते स्वतंत्रपणे द्यावे.' असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी केले. 

शिवछत्रपती रंगभवन सभागृहात बसपातर्फे आयोजित आंबेडकरी समाज संमेलनात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर बसपाचे प्रदेश सचिव ऍड. संजीव सदाफुले, नगरसेवक आनंद चंदनशिवे, राजेंद्र पाटील, बबलू गायकवाड उपस्थित होते. 
श्री. गरूड म्हणाले, "मराठा समाजातील 5 टक्के लोकांच्या हातात सत्ता व संपत्ती असून समाजातील 95 टक्के लोक गरीब आहेत. हेच गरीब मराठे आज किरकोळ काम करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजाच्या लोकांची संख्या जास्त आहे. म्हणून मराठ्यांना आरक्षण देण्याची गरज आहे.' 
"जगात कायदे व्हावे म्हणून आंदोलने केली जातात मात्र महाराष्ट्रात कायदे रद्द करा असे म्हणून आंदोलन करीत आहेत. अन्याय करणारा हा दबंग असतो. ऍट्रॉसिटीची फिर्याद देण्याऱ्या विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला जातो. ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करताना पोलिस हवी ती काळजी घेत नसल्यामुळे यातील गुन्हेगार सुटतात. कायदा कितीही चांगला असू द्या, तो राबविणाऱ्यावर अवलंबून असतो. दलित समाज हा जातीयवाद्यांचा सॉफ्ट टार्गेट आहे. हे शासन दलित, आदिवासींना न्याय मिळवून देणे सोडा ते भलतीच गोष्ट पुढे आणत आहेत.' असेही श्री. गरुड यांनी सांगितले. 

दोन्ही सत्ताधाऱ्यांमुळे प्रगती खुंटली 
महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत आघाडीने फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाने येथील सत्ता घेतली. त्यांनी जातीयवाद केला. तसेच सध्या ज्या लोकांचा आरक्षणाला विरोध आहे, अशा लोकांच्या हातात सत्ता आहे. या दोन्ही सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाची व्यवस्थित अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे दलित समाजाची म्हणावी तशी प्रगती झाली नाही. असे विलास गरूड सांगितले.