कचरा विलगीकरणासह खरेदीस प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

‘‘ओला-सुका कचरा वेगळा दिल्याचे पैसे मिळतात, असे समजल्यानंतर एका आजोबांनी ‘आम्हाला तुमची लाच नको’ असे म्हणत भररस्त्यात कचऱ्याची बादली पालथी केली. त्यांना ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे कारण समजून सांगण्यात आले. आता त्यांचा कचरा घंटागाडीत येऊ लागला आहे. लोकांना समजून सांगितल्यास लोक ऐकतात, हा अनुभव आहे.’’

- वसंत लेवे, सभापती, आरोग्य समिती, सातारा नगरपालिका

सातारा - पालिकेचा पथदर्शक प्रकल्प असलेला ओला-सुका कचरा विलगीकरण, खरेदी व खतनिर्मिती करण्याच्या प्रयोगास चिमणपुरा पेठेतून चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या अडीच महिन्यांत तब्बल ३६ हजार किलो ओला कचरा खत तयार करण्याच्या हौदामध्ये टाकण्यात आला. पालिकेने सुमारे ५४ हजार रुपये देऊन नागरिकांकडून हा ओला कचरा खरेदी केला आहे. दरम्यान, अद्यापि निम्म्या प्रभागात सुक्‍याबरोबर ओला कचराही एकत्रच घंटागाडीत जात असल्याचे चित्र आहे. 

चिमणपुरा व व्यंकटपुरा पेठेचा प्रामुख्याने समावेश असलेल्या प्रभाग १८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यात येत आहे. आरोग्य सभापती वसंत लेवे यांचा हा प्रभाग आहे. नागरिकांनी कचऱ्याचे निर्मिती केंद्र असलेल्या आपल्या घरातच ओला व सुका कचरा वेगळा ठेवावा. रोज येणाऱ्या घंटागाडीमार्फत ओला कचरा वजन करून घेण्यात येईल. नंतर हा कचरा सोनगाव कचरा डेपोतील हौदात साठविण्यात येईल. कुजण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कचऱ्यातून खतनिर्मिती होणार आहे. कचरा वर्गीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी दीड रुपया प्रति किलो दराने या कचऱ्याची खरेदी पालिका करत आहे. एक फेब्रुवारीपासून हा उपक्रम सुरू झाला. चिमणपुरा पेठेतून या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोज सरासरी १३० ते १३५ किलो ओला कचरा गोळा होतो. गेल्या अडीच महिन्यांत सुमारे ३६ हजार किलो ओला कचरा पालिकेच्या ‘कंपोस्ट पीट’मध्ये गेला. पहिला महिनाभर चिमणपुरा व व्यंकटपुरा या दोन्ही प्रमुख पेठांतून ओला कचरा वेगळा करून गोळा होत होता. मात्र, नंतर व्यंकटपुरा पेठेतील घंटागाडीत विस्कळित स्वरूपातील ओला-सुका कचरा वेगळा केला जातो.

Web Title: Response buys with garbage isolated