सांगली फाटा बनला ‘ब्लॅक स्पॉट’

शिरोली पुलाची - सांगली फाटा येथे वाहतुकीची कोंडी नित्याची आहे.
शिरोली पुलाची - सांगली फाटा येथे वाहतुकीची कोंडी नित्याची आहे.

शिरोली पुलाची - येथील सांगली फाट्यावर दिवसभरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि दररोजचाच अपघात यामुळे हा चौक महामार्ग आणि स्थानिक पोलिसांच्या यादीत ब्लॅक स्पॉट गणला गेला आहे. २००२ मध्ये महामार्गावरील अपघात कमी व्हावेत, वाहतूक कोंडी सुटावी, वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी चौपदरीकरणाला सुरुवात केली. हे चौपदरीकरण २००६ मध्ये घाईगडबडीत पूर्ण झाले; पण चौपदरीकरणानंतरही महामार्गावरील जी अपघात क्षेत्रे होती, ती तशीच राहिली. महामार्गावर सतत अपघात घडणारी ठिकाणे ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखली जातात. 

सांगली फाटा हे राष्ट्रीय महामार्ग व कोल्हापूर-सांगली राज्यमार्गाला जोडणारे ठिकाण आहे. या ठिकाणी कऱ्हाडला ज्याप्रमाणे उड्डाणपूल आहेत, तसेच उड्डाणपूल होणे अपेक्षित होते; मात्र येथे दोनपदरी अपुरा उड्डाणपूल बांधला. कोल्हापूरहून सांगलीकडे, सांगलीहून पुण्याच्या दिशेने आणि शिरोलीहून सांगलीकडे विरुद्ध दिशेने जाणारी वाहने उड्डाण पुलाखाली समोरासमोर येतात. 

यामुळे वारंवार वाहतूक विस्कळीत होते. उड्डाण पुलाखालीच मोठ्या प्रमाणात अपघात झालेत.

सांगली फाट्यावर महामार्गाला लागूनच वाळू मार्केट आहे. सांगली फाटा येथून हालोंडीपर्यंत दोन्ही बाजूंना रस्त्यालगतच मार्बल मार्केट आहे. या ठिकाणी परराज्यांतून माल घेऊन येणारी वाहने, दोन्ही बाजूंस असलेले पेट्रोल पंप, मोठे फर्निचर मॉल, गाड्यांचे शोरूम्स, ट्रॅक्‍टर शोरूम्स, पश्‍चिम महाराष्ट्राला पुरवठा करणारे मद्य गोदाम, सिमेंट गोदाम, विविध गोदाम, कोल्हापुरातील भाजीपाला मार्केट, दूध, साखर या सर्व व्यवसायासाठी दररोज सांगली फाटा येथून पंधराशेपेक्षा जादा मालवाहतूक गाड्या येतात व जातात. परिसरात शंभरहून अधिक ट्रान्सपोर्ट आहेत. 

भरधाव गाड्या थांबतात
चौपदरीकरणात सांगली फाटा येथे उड्डाणपूल उभारले; पण उड्डाणपूल पुण्याहून कोल्हापूरकडे जाण्यासाठी दुपदरी उभारला आहे. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूलच नाही. त्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्या सांगली फाटा येथे थांबतातच आणि अनेकदा वाहतूक कोंडी होते.

महामार्गावरच बस स्टॉप
शिरोली-सांगली फाटा येथील उड्डाणपुलासमोर महामार्गावरच दोन्ही बाजूंस दोन बस स्टॉप आहेत. वडगाव, कोल्हापूर, इचलकरंजी, हातकणंगले या ठिकाणी जाण्यासाठी वडापच्या गाड्या; तसेच पुणे, मुंबईला जाणाऱ्या आराम बस व पत्ता विचारायला मालवाहतूक वाहने या ठिकाणी महामार्गावर मध्येच थांबवली जातात. 

भुयारी मार्ग नाहीत
महामार्गाच्या दोन्ही बाजूंना शिरोली, नागाव, हालोंडी येथील शेतकऱ्यांची शेती आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कुठेही भुयारी मार्ग ठेवलेला नाही. पायी, सायकल, मोटारसायकल आणि बैलगाडीमधून महामार्ग ओलांडताना अनेक अपघात झालेत. शेतकऱ्यांचा नेहमी जीव धोक्‍यात घालूनच प्रवास सुरू असतो.

दृष्टिक्षेपात
170 सहा वर्षांत झालेले अपघात
27 अपघातात बळी
135 कायमचे अपंगत्व आलेले

सांगली फाटा उड्डाणपुलाचे छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल नामकरण केले आहे. सहापदरीकरणात पूल मोठा व्हावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- शशिकांत खवरे, सरपंच

स्थानिक वाहने महामार्गावर येणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. सांगली फाटा येथे महामार्गाला बॅरिकेडस्‌ लावले पाहिजेत.
- रणजित डांगे, तालुकाध्यक्ष, शिवसेनाप्रणीत अवजड वाहतूक सेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com