पायाभूत सुविधांना 'रुसा'चे प्राधान्य - प्रकाश जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

कोल्हापूर - उच्चशिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी संशोधकीय पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यास "राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) प्राधान्य दिले जात आहे. त्याची सुरवात देशातील 17 महत्त्वाच्या प्रकल्पांच्या माध्यमातून आज होत आहे, ही आनंदाची बाब आहे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी व्यक्त केले.

कोल्हापूर - उच्चशिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी संशोधकीय पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यास "राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) प्राधान्य दिले जात आहे. त्याची सुरवात देशातील 17 महत्त्वाच्या प्रकल्पांच्या माध्यमातून आज होत आहे, ही आनंदाची बाब आहे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी व्यक्त केले.

जावडेकर यांनी आज सकाळी नवी दिल्लीतील मंत्रालयाच्या मुख्यालयातून शिवाजी विद्यापीठासह देशभरातील 17 विद्यापीठांमधील "रुसांतर्गत उभारलेल्या विविध सुविधांचे डिजिटल उद्‌घाटन केले. त्या वेळी ते बोलत होते. उद्‌घाटनाचा पहिला सन्मान शिवाजी विद्यापीठाच्या "नॅचरल प्रॉडक्‍ट्‌स ऍन्ड अल्टरनेटिव्ह मेडिसीन' केंद्रास मिळाला.

या वेळी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, प्रधान सचिव व राज्य प्रकल्प संचालक (रुसा) मीता राजीवलोचन, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जी. एन. शिंदे, विद्यापीठाच्या रुसा केंद्राच्या समन्वयक डॉ. अकल्पिता अरविंदेकर, "रुसा'चे सहसंचालक शरद पाटील उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले, 'उच्चशिक्षणाचा दर्जा वाढावा, यासाठी केंद्र सरकारने संशोधकीय पायाभूत सुविधांसाठी सुमारे 2800 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील 1300 कोटींचे वितरण"रुसा'च्या अंतर्गत करण्यात येत आहे. आजपर्यंतचा हा सर्वोत्कृष्ट उपक्रम असून "रुसा' ही केवळ नियंत्रण संस्था नाही, तर उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे कार्यही तिच्याकडून अपेक्षित आहे. ज्या शिक्षण संस्था दर्जा कायम राखतील, त्यांनाच "रुसा'च्या माध्यमातून निधी प्रदान करण्यात येईल.''

शिवाजी विद्यापीठाच्या नॅचरल प्रॉडक्‍ट्‌स ऍन्ड अल्टरनेटिव्ह मेडिसिनविषयक "रुसा' केंद्राची आपण प्रत्यक्ष पाहणी केली असून तेथे उत्तम सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण दिले. जावडेकर यांच्या हस्ते "रुसा'चे पोर्टल आणि मोबाईल ऍप्लिकेशनचेही उद्‌घाटन झाले. नवी दिल्ली येथून रुसाच्या राष्ट्रीय मिशन संचालक इशिता रॉय यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव केवलकुमार शर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठास दीड कोटी
शिवाजी विद्यापीठातील "रुसा सेंटर फॉर नॅचरल प्रोडक्‍ट्‌स ऍन्ड अल्टरनेटिव्ह मेडिसीन' उभारण्यासाठी "रुसा'कडून सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातून अत्याधुनिक संशोधन सामग्रीने सुसज्ज असे केंद्र विद्यापीठात साकारले आहे. केंद्रात औषधे, न्युट्रास्युटिकल आणि कॉस्मेटिक उद्योगांसाठी आवश्‍यक असणाऱ्या वनौषधींवर प्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.