वाचकांनो, ढोंगी साहित्यिकांना जागा दाखवा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

प्रेम आणि राजकारण 
केळुस्कर यांनी भाषणानंतर काही झणझणीत कविता सादर केल्या. ते म्हणाले, ""प्रेम आणि राजकारण ही दोन्ही क्षेत्रे अशी आहेत, की त्यात माणूस काल काय बोलतो आणि आज काय बोलतो याचे त्याला भान नसते.'' यावर उपस्थितांत हशा पिकला. 

इस्लामपूर - साहित्यात जात पाहून काही गोष्टी ठरतात हे दुर्दैव आहे. जातीसाठी मराठीची माती करणाऱ्यांचा निषेध डोंबिवलीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनात व्हायला हवा, असे प्रतिपादन साहित्यिक महेश केळुस्कर यांनी आज येथे केले. तथाकथित ढोंगी साहित्यिकांना वाचकांनी जागा दाखवावी, असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्र साहित्य परिषद व राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने आयोजित 24 व्या मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुकर हसमनिस यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. वैजनाथ महाजन, प्रा. शामराव पाटील, दशरथ पाटील, दि. बा. पाटील, दीपक स्वामी प्रमुख उपस्थित होते. डॉ. चंद्रशेखर चिंगरे (पुणे) व कैलास सलादे (वडनेर, नाशिक) यांना लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मिती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कवी शहानवाज मुल्ला, राजेंद्र टिळे, प्राचार्य डी. जी. कणसे यांचे सत्कार झाले. 

केळुस्कर म्हणाले, ""छोट्या संमेलनात आंतरिक संवाद होतो. उत्कटता टिकवून ठेवणे म्हणजेच भाषा आणि साहित्य टिकवून ठेवणे आहे. मराठी पुस्तकांना वाचक नाहीत ही ओरड मतलबी आहे. वाचक मोठा दबावगट आहे. त्याने निर्भीडपणे प्रश्न विचारले पाहिजेत.'' डॉ. हसमनिस म्हणाले, ""नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी छोट्या-छोट्या संमेलनांची गरज आहे. तेथे होणाऱ्या चर्चा महत्त्वाच्या ठरतात, जे अखिल भारतीय संमेलनात होत नाहीत. मराठी टिकली पाहिजे. मराठीतल्या दिग्गज लेखकांच्या साहित्याचे अनुवाद आवश्‍यक आहेत. जातीपातीच्या पलीकडे जाऊन साहित्य निर्माण झाले पाहिजे.'' प्रा. प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दीपा देशपांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. सूरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. सर्जेराव कचरे यांनी आभार मानले. 

Web Title: sahitya sammelan in islapur