सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयासाठी ५० लाख मंजूर

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी आगाशिवनगर येथे तीन हेक्‍टरची जागा मंजूर झाली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील पन्नास लाखांचा निधी मंजूर झाला आहे. प्राथमिक टप्प्यातील अनेक कामे करावी लागणार आहेत. त्यानंतर इमारतीचा ले-आऊट करून त्याचे काम सुरू होणार आहे.

- मिलिंद पंडितराव, विभागीय वनाधिकारी

आगाशिवनगरात तीन हेक्‍टर जागा देणार; उपवनसंरक्षक पदही मिळणार

कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी येथील आगाशिवनगर परिसरात तीन हेक्‍टर जागा व सुसज्ज इमारतीसाठी सुमारे ५० लाखांचा प्राथमिक निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे येथे व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या दोन मोठ्या इमारती लवकरच साकारणार आहेत. त्याशिवाय प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांचे कार्यालयही त्यात करण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर सुरू आहे. प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी पद सध्या येथे आहे. त्या पदाचा दर्जा वाढवून तो उपवनसंरक्षक करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी राज्य शासनाकडे केली आहे, त्यामुळे ते पदही येथे मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. 

 

कोयना व चांदोलीत सुमारे एक हजार १६५ चौरस किलोमीटरमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारतो आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांच्या हद्दीवर प्रकल्प साकारत आहे. प्रकल्पाचा कोअर झोन ६४५.१२ चौरस किलोमीटरचा आहे. बफर झोन ५६४.८८ चौरस किलोमीटरचा आहे. प्रकल्पासाठी कोयना व चांदोलीसह सागरेश्‍वरचाही विचार करता कऱ्हाड मध्यवर्ती ठिकाण आहे. सध्या येथील शिवाजी हाउसिंग सोसायटीत प्रकल्पाचे विभागीय कार्यालय आहे. प्रकल्पाचे स्वतःचे कार्यालय असावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. त्याला यश आले आहे. कोयना व चांदोली अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयासाठी तीन हेक्‍टरची जागा व त्यासाठी मिळालेला ५० लाखांचा निधी म्हणजे प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा यानिमित्ताने पूर्ण होत आहे. सध्याचे कार्यालय छोटे असून, ते भाडे तत्त्वावर आहे. त्यामुळे येथे सुसज्ज कार्यालय असावे, अशी मागणी होती. ती शासनाने पूर्ण केली आहे. शासनाच्या वन विभागाचीच आगाशिवनगरला तीन हेक्‍टर जागा आहे, ती व्याघ्र प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. तेथे काही सोपस्कार पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील ५० लाखांचा निधीही शासनाने मंजूर केला आहे.