‘विक्रमसिंह घाटगे यांच्या विचारधारेचा सन्मान’

‘विक्रमसिंह घाटगे यांच्या विचारधारेचा सन्मान’

कागल - भाजप शब्द पाळणारा पक्ष आहे. मला मिळालेले पद हा राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या निकोप विचारधारेचा सन्मान आहे. त्यांच्या आजवरच्या योगदानामुळेच मला हे पद मिळाले आहे. २०२२ पर्यंत ‘प्रत्येकाला घर’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. या पदाला न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असे प्रतिपादन म्हाडाचे नूतन अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी श्रीमंत नवोदिता घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती झाल्याचे पत्र आज त्यांना मिळाले. 

श्री. घाटगे म्हणाले, ‘‘मी श्री क्षेत्र जोतिबाच्या वाटेवर असताना, मला ही गोड बातमी समजली. हा मंगल योगायोग आहे. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्‍वभूमीवर माझी झालेली ही निवड हा आणखी एक योगायोग म्हणावा लागेल. हे पद घेण्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीपासूनच आग्रही होते. मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मी आभारी आहे. त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्‍वास मी सार्थ करून दाखवीन. उद्या (ता. ११) सकाळी दहा वाजता पुण्याच्या कार्यालयात जाऊन हा पदभार स्वीकारणार आहे. दरम्यान, म्हाडाच्या अध्यक्षपदी समरजितसिंह घाटगे यांची निवड झाल्याचे वृत्त शहरासह तालुक्‍यात समजताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्‍यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, साखर-पेढ्याचे वाटप व डिजिटल फलक उभारून या निवडीचे स्वागत केले. सोशल मीडियावरू बातमी व्हायरल झाली आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शाहू कारखान्याचे प्रधान कार्यालय असलेल्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन येथे अभिनंदनासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. 

म्हणूनच पद लवकर मिळाले
नुकत्याच झालेल्या नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत समरजितसिंह घाटगे यांच्या लाल दिव्याच्या गाडीचा मुद्दा विरोधकांनी वेगळ्या भावनेतून वरचेवर मांडला होता. याबाबत श्री. घाटगे म्हणाले, ‘‘विरोधकांनी प्रचारादरम्यान सतत माझ्या लाल दिव्याच्या गाडीच्या उल्लेख केला. त्याचीच नोंद घेऊन हे पद मला लवकर मिळाले. उल्लेख करणाऱ्यांना मी धन्यवाद देतो.’’ 

खंत आणि सन्मान
पात्रता आणि दर्जा असूनही राजे विक्रमसिंह घाटगे यांना अशा पदापासून वंचित ठेवले. अशी खंत व्यक्त करून श्री. घाटगे म्हणाले, ‘‘आजवर शाहू महाराजांचे नाव अनेकांनी अनेक वेळा घेतले आहे; पण म्हणावा तसा मान या घराण्याचा राखला गेला नाही. भाजपने मात्र संभाजीराजे छत्रपती यांना खासदार व मला म्हाडाचे अध्यक्षपद देऊन या घराण्याचा सन्मान केला आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com