दोन लाखांचे आणखी एक सांबरशिंग जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

सांगली - सांबरशिंगाच्या तस्करीप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी अटक केलेल्या सहाजणांच्या टोळीकडून आणखी एक सांबरशिंग पोलिसांनी आज जप्त केले. सिद्राम बसाप्पा अंगडगिरी (रा. पद्माळे फाटा, सांगली) याच्या घरातून शिंग जप्त केले. त्याची किंमत सुमारे दोन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाजणांची पोलिस कोठडी शुक्रवारी संपणार आहे. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

सांबरशिंग तस्करीप्रकरणी कृष्णा शिवाजी मोहिते (कसबे डिग्रज), महेश मोहन राव (शिंदे मळा, सांगली), चंद्रकांत बाबासाहेब कांबळे (नेज, ता. हातकणंगले), अतुल बाबासाहेब कल्याणी (रूकडी, ता. हातकणंगले), इस्लामपूर तहसीलमधील लिपीक दत्तात्रय बापूसाहेब मोटे (विश्रामबाग), सिद्राम बसाप्पा अंगडगिरी (पद्माळे फाटा, सांगली) या सहाजणांना शहर पोलिसांनी आठवड्यापूर्वी अटक केली होती. टोळीकडून चार लाख रुपयांचे सांबरशिंग, मोटार, मोबाईल आणि चाकू असा 13 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

टोळीच्या पोलिस कोठडीत मंगळवारी (ता.14) तीन दिवसांची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी टोळीकडे आणखी एक सांबरशिंग असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार सहाजणांची पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा अंगडगिरी याने घरात आणखी एक शिंग असल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेऊन दोन लाख रुपये किमतीचे सांबरशिंग जप्त केले. 

सहाजणांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करून पुन्हा पोलिस कोठडी वाढवून मागितली जाणार आहे. पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे तपास करत आहेत. 

शिकार की चोरी ?- 
अंगडगिरी हा संशयित जुने बांधकाम पाडापाडीची कामे करतो. त्याने कोठेतरी बांधकाम पाडताना सांबरशिंगाची चोरी केली असावी किंवा त्याला मिळाले असावे. ते त्याने इतरामार्फत विक्रीचा प्रयत्न केल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. पोलिसांना आठवडाभराच्या तपासात याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे तपासाकडे लक्ष लागले आहे.