सांगली : आटपाडीसाठी ६१८९ घरकुले मंजूर

६० गावांतील लाभार्थी; सन २०२१-२२ साठी उद्दिष्ट तोकडे असल्‍याने अडचण
pradhanmantri awas yojana
pradhanmantri awas yojanasakal

आटपाडी: पंतप्रधान घरकुल योजनेतून आटपाडी तालुक्यातील ६० गावांतील ६ हजार १८९ लाभार्थींना ‘ड’ यादीत मंजुरी मिळाली आहे. मात्र मंजुरीच्या पाच टक्के म्हणजेच ३५७ लाभार्थींचे सन २०२१-२२ साठी तोकडे उद्दिष्ट मिळाले आहे. मंजुरीच्या तुलनेत उद्दिष्ट कमी मिळाल्याने शेवटच्या लाभार्थीला सहा ते नऊ वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पंतप्रधान ग्रामीण घरकुल योजनेची ‘ड’ यादी प्रसिद्ध झाली आहे. तालुक्यातील साठ गावातील ६ हजार १८९ लाभार्थींना मंजुरी दिली आहे. योजनेतून २७० चौरस फुट घराचे बांधकाम केले जाते. एक लाख २० हजारांचे अनुदान, शौचालयासाठी नरेगातून १८हजार रुपये दिले जातात.आटपाडी तालुक्यातील लाभार्थींची संख्या मोठी आहे. मंजुरी मिळालेल्या सर्व लाभार्थींना बांधकाम सुरू करण्याचे आदेश दिलेले नाहीत. सन २०२१-२२ साठी प्रशासनाला ३५७ घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट मिळाले आहे. तेवढ्याच लोकांचे प्रस्तव मागवले आहेत. घरकुल मंजुरीची यादी मोठी असून सन २०२१-२२ वर्षासाठी प्रत्यक्षात बांधकामाचे उद्दिष्ट अत्यंत कमी मिळाले आहे. या पध्दतीने दरवर्षी मंजूर यादीतील तीनशे ते पाचशे घरकुलाचे उद्दिष्ट मिळाल्यास यादीतील शेवटच्या लाभार्थीचे बांधकामाला सहा ते नऊ वर्षे लागणार आहे.

मंजूर यादीतील प्राधान्यक्रमावर नाराजी

घरकुलमधून मंजुरी मिळालेल्या लोकांमधून प्राधान्यक्रम ग्रामपंचायत आणि ग्रामसभेतून आलेल्या नावाप्रमाणे देण्याची गरज आहे. अनेकांना कसलाही निवारा नाही. त्यांना निवाऱ्याची अत्यंत गरज आहे. अशा लोकांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचा विचार न घेता प्रशासनानेच परस्पर प्राधान्यक्रम ठरवल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. अनेकांनी मंजुरी असल्यामुळे उसनवार करून अर्धे बांधकाम केले आहे. प्रत्यक्षात त्यांना बांधकामाचे आदेश नसल्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने यातून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे.

मंजूर घरकुलांमधून दरवर्षीसाठी उद्दिष्ट शासनाकडून ठरवून येते. तेवढ्याच लोकांना बांधकामाची मान्यता दिली जाते. तसेच प्राधान्यक्रमही शासन स्तरावरून आला आहे. आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. त्‍यामुळे उद्दिष्‍टा इतकीच घरकुले बांधली जातील.

- मनोज भोसले, गट विकास अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com