अंतिम अंदाजपत्रक विसावले ६८० कोटींवर

अंतिम अंदाजपत्रक विसावले ६८० कोटींवर

सांगली - महापौर हारुण शिकलगार यांनी आज २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीचे ६८० कोटींचे अंदाजपत्रक कायम केले. त्याआधी प्रशासनाने स्थायी समितीला ५८० कोटींचे, तर स्थायी समितीने महासभेला ६४३ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. ते अंतिम करताना महापौरांनी काही तरतुदींना कात्री लावताना तर काही कामे नव्याने सुचवली आहेत. ही सर्व कामे सर्वच नगरसेवकांना न्याय देणारी आहे. पक्षनिरपेक्षपणे सर्वांना न्याय द्यायचा माझा प्रयत्न असून येत्या मंगळवारी (ता. १६) महापालिका क्षेत्रातील प्रमुख अशा २३ कोटींच्या रस्ते कामांना प्रारंभ होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्री. शिकलगार म्हणाले, ‘‘कुपवाड विभागासाठी स्वतंत्र १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात प्रत्येक सदस्यांच्या वाट्याला ५० लाखांचा विकास निधी देऊ केला आहे. 

खणभागातील महापालिकेच्या निदान केंद्रासाठी एमआरआय मशिन्स बसवण्यासाठी साडेचार कोटींची तरतूद केली आहे. शामरावनगरासाठी स्वतंत्र सहा कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. क्रांतिसिंह  नाना पाटील पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी २० लाख, सांगली बायपास रस्त्यावरील नवी स्मशानभूमीसाठी  पन्नास लाख, विश्रामबाग येथील भाजी मंडईसाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. काही नव्या कामांचा  मनोदय व्यक्त केला आहे. त्यात हिराबाग जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्ती, पुष्पराज चौक ते विश्रामबागपर्यंत एलइडी लाईट बसवणे, झुलेलाल चौक ते शंभर फुटीपर्यंत मोठी गटार बांधणे, मजुरांसाठी निवारा शेड उभी करणे, चौक सुशोभीकरण, शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण, रहदारीला अडथळा ठरणारे खांब हटवणे या कामांसाठी तरतूद केली आहे.’’

ते म्हणाले,‘‘सर्व सदस्यांच्या सूचनांचा विचार करून सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. पक्ष कोणता यापेक्षा प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात कामे व्हावीत. त्यासाठी निधी मिळावा यासाठी माझे प्रयत्न आहेत. २३ कोटींचे रस्ते कोणत्या प्रभागात होत आहेत यापेक्षा त्या भागाची ती गरज विचारात घेऊन निर्णय केला आहे. या कामांचे नारळ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हस्ते वाढवले जातील. ज्येष्ठ नेते पतंगराव कदम आणि जयंत पाटील, नेत्या जयश्री पाटील, प्रतीक पाटील, विशाल पाटील अशी सर्व नेते मंडळी मंगळवारी उपस्थित राहणार आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com