राज्यात १५ टक्‍क्‍यांवर दूध भेसळयुक्त - राजू शेट्टी

राज्यात १५ टक्‍क्‍यांवर दूध भेसळयुक्त - राजू शेट्टी

सांगली - राज्यात १५ टक्के दूध हे भेसळयुक्त आहे. हा काळा बाजार आहे, जो दुधाचा प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांच्या मूळावर उठला आहे. शिवाय राजरोसपणे लोकांच्या अन्नात विषही कालवले जात आहे. त्याविरुद्ध अन्नसुरक्षा कायद्यात बदल करून भेसळ करणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळा, हातात बेड्या ठोका, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

डोर्ली (ता. तासगाव) येथे बबन देशमुख याने उघडपणे रोज पाचशे लिटर बनावट दूध बनविण्याचा कारखानाच चालविला होता. त्याविरुद्ध अन्न-औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली. त्यापुढील गोष्टींचा पर्दाफाश ‘सकाळ’ व साम टीव्हीने केला. राज्यभरातील या विषयातील भयानक तथ्य समोर आणले. बबन देशमुख बनावट दूध भाजप नेत्याच्या डेअरीलाच पाठवत होता, हेही समोर आले. हे भयानक वास्तव एका बाजूला असताना त्या देशमुखवर कडक कारवाई करताना कायद्याने या विभागाचे हात बांधल्याचे सांगितले जात आहे. त्याविषयी शेट्टी यांनी तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले, ‘‘केवळ दोन ते अडीच रुपयांत बनावट एक लिटर दूध तयार होते. ते दुधात मिसळून स्वस्त दराने दूध बाजारात आणणारी एक साखळी आहे. प्रामाणिकपणे दुधाचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये २५ पैशांपासून ते एक रुपयापर्यंत स्पर्धा असते. राज्यात अशा पद्धतीने दूध भेसळ करण्याचे प्रमाण १५ टक्‍क्‍यांवर असल्याची आमची खात्री आहे. त्याविषयी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, या लोकांच्या मुसक्‍या आवळा, असे सांगितले. या विभागाकडून केवळ कारवाई केली जाते आणि दंड घेतला जातो. त्यातून फार काही साध्य होत नाही. कायद्याचा वचक राहत नाही. यांना दणका द्यायचा असेल तर कायद्यात बदल करावा लागेल. अन्नसुरक्षा कायदा बदलून कडक करावा लागेल. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठपुरावा करेल.’’

चौघांची निवडणूक ‘ड्यूटी’तून सुटका
अन्नसुरक्षा विभागात पाच लोक कार्यरत आहेत. पैकी चौघांना ग्रामपंचायत निवडणुकीची ड्यूटी लावली होती. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर भेसळीविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. विशेषतः खव्यातील भेसळ उघड करा, असे सांगितले आहे. निवडणूक तर ऐन दिवाळीत आहे, मग कसे होणार, हा मुद्दा ‘सकाळ’ने पुढे आणला. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ त्याची दखल घेत चार अधिकाऱ्यांना निवडणूक ‘ड्यूटी’तून मुक्त केले आहे. आता कारवाई कशी होते, याकडे लक्ष असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com