सेकंड इनिंगही देशसेवेसाठीच 

शैलेश पेटकर
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

वडील स्वातंत्र्य सैनिक. आई प्राथमिक शिक्षिका. त्यामुळे घरात लहानपणापासूनच देशसेवेचे बाळकडू त्यांना मिळाले होते. वयाच्या 19 व्या वर्षी भारतीय वायुसेनेत संधी मिळाली अन्‌ तिथून देशसेवेची पहिली इनिंग सुरू झाली. 26 वर्षांच्या सेवेनंतर ग्रुप कॅप्टन पदावर ते निवृत्त झाले. त्यानंतर सांगलीत स्थायिक झाले. इथल्या ग्रामीण भागातील मुलांना वायुसेनेची माहिती पोहोचवत त्यांना त्या सेवेसाठी प्रेरित करणे हिच त्यांच्या देशसेवेची सेकंड इनिंग ठरते आहे. वेट्रन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांची ही कहाणी... 

श्रीकांत वालवडकर यांचे मूळ गाव आंबेजोगाई. वडील बाळकृष्ण वालवडकर स्वातंत्र्य सैनिक. आई प्राथमिक शिक्षिका. त्यामुळे शिक्षणाशिवाय आपण जगात टिकणार नाही, इतक शिक्षण आई-वडिलांनी दिले होते. त्यामुळे शिक्षणाला पहिले प्राधान्य देण्यात आले होते. योगेश्‍वरी महाविद्यालयात श्रीकांत वालवडकर यांचे बीएस्सी प्रथम क्षेणीत पूर्ण झाले. सुटीच्या काळात मुंबईतील भाऊ त्यांच्याकडे आले होते. त्यांनी वायुसेनेतील भरतीबाबत त्यांना सांगितले. श्रीकांत वालवडकर यांनी तातडीने वायुसेनेसाठी अर्ज केला. बारामती येथे चाचणी झाली. तेथे 200 मुलांतून सहा जणांची निवड झाली. त्यात त्यांचा समावेश होता. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी दिल्लीत बोलवण्यात आले होते. कधी न पाहिलेल्या दिल्लीत यानिमित्ताने धक्काधक्कीने पोहोचले. तेथून परतल्यानंतर एमएस्सीसाठी पुन्हा त्यांनी प्रवेश घेतला. त्यावेळी काही महिन्यांतच त्यांना निवड झाल्याचे पत्र घरी आले. आणि तेथून त्यांच्या देशसेवेला सुरवात झाली. हैदराबाद येथे प्रशिक्षण झाले. सिंकदराबाद येथे नियुक्ती झाली. तेथे वायुसेनेत टिकून राहण्याची मानसिकता तयार झाली. तेथून लेह-लडाख येथे 1983 मध्ये नियुक्ती झाली. कामाच्या प्रामाणिकतेमुळेच काही महिन्यांतच सियाचीन ऑप्रेशनमध्ये सहभागी होण्याची संधी श्री. वालवडकर यांना मिळाली. त्यानंतर पुणे, आग्रासह देशभरात ठिकठिकाणी बदली झाली. मध्यंतरीच्या काळात मिरजेतील सुलभा कुलकर्णी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्याही देशेसेवाचा वारसा असल्याने नाते अधिक घट्ट झाले. 

वायुसेनेत अनेक पदांवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. लग्न ठरल्यानंतरच श्रीलंका ऑप्रेशनमध्ये त्यांचा सहभाग होता. यशस्वी पार पडल्यानंतर लग्न झाले. तमिळनाडूमध्ये नियुक्ती असताना ते कमांडिंग ऑफिसर झाले. त्यांच्या कामाची दखल घेऊन सरकारने त्यांना पुरस्कारही दिला. त्यानंतर 1999 मध्ये कारगीलच्या युद्धात त्यांचा खारीच्या वाट्याप्रमाणे सहभाग होता. तब्बल 26 वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी निवृत्ती घेतली. 

निवृत्तीनंतर देशसेवा सुरू ठेवण्यासाठी सांगलीत दाखल झाले. ग्रामीण भागातील मुलांना वायुसेनेची माहिती देण्यास सुरवात केली. इथल्या मुलांमध्ये देशसेवा निर्माण करून त्यांना प्रेरित करण्याचा एकच त्यांचा प्रयत्न सुरू झाला. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच तासगाव येथील सैनिक शाळेत 8 ते 13 मे दरम्यान वायुसेनेची वायुसैनिक भरती झाली. इंडियन एअरफोर्स-सिक्‍युरेटी (आयएएफ-एस) आणि मेडिकल असिस्टंट पदासाठी 239 मुलांची निवड झाली. सध्या ते शिवाजी विद्यापीठाच्या सहयोगाने मार्गदर्शन वर्ग घेत आहेत. त्यांच्या देशसेवेची ही सेकंड इनिंग असल्याचेच ते म्हणतात. आजही ते सकाळपासून सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनच करतात. स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या कार्याला हा सलामच.