ऐतिहासिक ध्वजवंदनाची "लगीनघाई' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

सांगली - रंगरंगोटी अखेरच्या टप्प्यात आलेली... झाडे लावण्याचे काम गतीने सुरू... हिरवळ मातीशी एकरूप होतेय... रांगोळी कलाकार नियोजनात गुंतलेत... कर्मचाऱ्यांची लगबग उडालीय... या साऱ्याचे नियोजन करण्यात निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी व्यस्त दिसताहेत... मैदानात उतरून साऱ्या तयारीचा आढावा घेत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील सूचना देताहेत... नव्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर असे लगीनघाईचे चित्र होते. 

यंदाचा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा नव्या जिल्हाधिकारी कार्यालयासाठी ऐतिहासिक क्षण घेऊन येतोय. इथले पहिले ध्वजवंदन उद्या (ता. 15) होणार आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते सकाळी नऊला हा सोहळा होईल. त्याच्या तयारीत शेकडो हात गुंतले होते. व्यासपीठ मांडणी, मंडप उभारणी, ग्रिलींगला रंगरंगोटी, खुर्च्या मांडणी, खडे-कचरा वेचून साफसफाई अशी तयारी सुरू होती. महापालिका कर्मचाऱ्यांची फौज त्यासाठी दाखल झाली होती. गेल्या दोन-एक महिन्यांपासून धुळीने माखलेल्या कार्यालयाला झाडलोट करण्यात आली. रद्दी मार्गी लावण्यात आली. 

या सोहळ्यात पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते चांदोली धरणग्रस्तांना जागांचे वाटप केले जाणार आहे. इंटरनेट उतारा वाटपाचा प्रारंभ होईल. 

हे असेल आकर्षण 
ऐतिहासिक ध्वजवंदन सोहळ्याच्या स्वागताला संस्कारभारतीची रांगोळी सजणार आहे. कवठेपिरानच्या दारूचे काही बार हवेत उडणार आहेत. रंगीबिरंगी फुगे हवेत झेपावणार आहेत. पाहुण्यांच्या स्वागताचा ढोल वाजेल अन्‌ गुलाबपुष्प देऊन सांगलीकरांचे स्वागत केले जाणार आहे.