बदली अध्यादेशाविरोधात शिक्षक सर्वोच्च न्यायालयात
सांगली - शिक्षक बदलीसाठीचा राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारीच्या अध्यादेशाला आव्हान आणि मध्यावधी बदली प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षक भारती संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सांगली - शिक्षक बदलीसाठीचा राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारीच्या अध्यादेशाला आव्हान आणि मध्यावधी बदली प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षक भारती संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संघटनेच्या च्या सांगली, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर शाखांनी एकत्रितपणे याचिका दाखल केली आहे. त्यावर आता होणाऱ्या सुनावणीकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिक्षक बदल्यासाठी २७ फेब्रुवारीच्या ‘जीआर’ नंतर शासनाने १२ सप्टेंबर रोजी शुद्धिपत्रक काढले होते. त्यानुसार बदल्या करण्याचे आदेश दिले. शिक्षक भारती, शिक्षक संघ आणि इतर संघटनांनी या शुद्धिपत्रकाला आव्हान देणारी याचिका नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकाकर्ते संघटनांचे वकील ॲड. सतीश तळेकर यांनी तेथे युक्तिवाद केला. दरम्यान, शुद्धिपत्रकानुसार बदल्यांना स्थगिती मिळाली; परंतु शासनाने पुन्हा २७ फेब्रुवारीच्या ‘जीआर’प्रमाणे बदल्या करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बदली प्रक्रिया सध्या सुरू आहे; मात्र ऑनलाईन प्रक्रियेतील गोंधळामुळे बदल्यांमध्ये अडथळे येत आहेत.
उच्च न्यायालयातील निकालानंतर शिक्षक भारती सांगली शाखेचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे यांनी कोल्हापूर, नाशिक व सोलापूर संघटनांतर्फे सर्वोच्च न्यायालयात काल (ता.३०) याचिका दाखल केली आहे. २७ फेब्रुवारी ‘जीआर’ ला आव्हान देणारी ही याचिका आहे. ‘जीआर’ ला विरोध करून मध्यावधी बदली प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.
मध्यावधी बदल्या करता येत नसल्याबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायनिवाडाही याचिकेसोबत दाखल केला आहे. शिक्षक भारतीच्यावतीने ॲड. अतुल डख काम पाहणार आहेत. त्यांना ॲड. सतीश तळेकर यांचे मार्गदर्शन असणार आहे. शिक्षक भारतीबरोबर औरंगाबाद येथील संघटनेची याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. दोन्ही याचिकांवर लवकरच एकत्रित सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिक्षकांचे सुनावणीकडे लक्ष लागले आहे.