कामटेची ६ तास इन कॅमेरा झडती

कामटेची ६ तास इन कॅमेरा झडती

सांगली -उपनिरीक्षक युवराज कामटे याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहा तास इन कॅमेरा कसून चौकशी केली. या प्रकरणातील कोणाही वरिष्ठ अधिकाऱ्याला क्‍लीन चिट दिली नसल्याचा खुलासाही अधिकाऱ्यांनी पत्रकारांसमोर केला. 

दरम्यान, अनिकेत कोथळेच्या पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपाधीक्षक दीपाली काळे यांची केव्हाही चौकशी केली जाऊ शकते, अशी पूर्वकल्पना दिली आहे. त्यांची चौकशी विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून होणार असल्याचेही सांगण्यात आले.

शहर पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) सोपवला आहे. सध्या तपासाला गती आली आहे. चौकशी सुरू आहे. गुन्ह्यातील मुख्य संशयित कामटेची आज सखोल चौकशी झाली. सक्षम पुरावे गोळा करण्यासाठी प्रत्यक्ष कृत्यात सहभागी असलेल्या पाचही संशयितांची टप्प्याटप्प्याने चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.

अनिकेतचा साथीदार अमोल भंडारेचा काल न्यायालयीन कोठडीत जबाब घेतला. त्यांच्यासह घटनेवेळी शहर पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेले सात निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांचाही जबाबही आज नोंदविले. तपासासाठी सांगलीसह कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यांतील अधिकारी सांगलीत दाखल झाले आहेत. 

२५ नोव्हेंबरला महामोर्चा
कोथळेच्या मृत्यूप्रकरणी येत्या २५ नोव्हेंबरला  सर्वपक्षीय कृती समितीने महामोर्चाची हाक दिली आहे.  या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे सांगलीचे दौरे नियोजित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर सांगलीचे राजकीय हवामान तापलेले राहण्याची शक्‍यता आहे. उपाधीक्षक दीपाली काळे यांना सहआरोपी करा, अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची बदली करा, उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा, केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे चौकशी सोपवा या महामोर्चाच्या मागण्या असतील, असे आज सर्वपक्षीय कृती समितीने स्पष्ट केले.

‘त्या’ डॉक्‍टरचीही चौकशी 
कोठडीत मृत्यू झाल्यानंतर कोथळेचा मृतदेह विश्रामबागमधील एका खासगी रुग्णालयात नेला होता. हे तपासात स्पष्ट झाले आहे. त्या रुग्णालयाची आणि डॉक्‍टरांची चौकशी केली जाणार आहे. संबंधित डॉक्‍टरने पोलिस वाहनातच तपासणी केली. त्यावरून त्याला हे प्रकरण संशयास्पद असल्याची पुरेशी जाणीव होती. त्यावेळी जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी या प्रकरणाची कल्पना वरिष्ठ पोलिसांना दिली असती तर मृतदेहाची पुढची हेळसांड टळली असती. अनिकेतच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केलेल्या लकी बॅगचे मालक नीलेश खत्री यांची चौकशी सुरू असल्याचे समजते.

निकमच सरकारी वकील पालकमंत्र्यांचे स्पष्टीकरण
कोथळेच्या मृत्यूप्रकरणी विशेष सरकारी म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांचीच नियुक्ती केली जाईल, असे आज पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘सकाळ’ शी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले,‘‘नियुक्ती कार्यपद्धती न्याय व विधी विभागाकडून राबवली जात आहे. लवकरच त्यांच्याशी पत्रव्यवहार केला जाईल. खटला चालवण्यासाठी शासनाकडून अजून कोणीही संपर्क  साधला नाही, असे ॲड. निकम यांनी काल ‘सकाळ’ ला सांगितले होते. त्यावर आज पालकमंत्री देशमुख यांनी खुलासा केला. ते म्हणाले,‘‘ॲड. निकम यांच्या नियुक्तीबाबत कोथळे कुटुंबीयांचा आग्रह होता.  त्यानुसार ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.’’ 

वरिष्ठांवर टांगती तलवार
कोथळे मृत्यूप्रकरणी जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. आज मुंबईत महासंचालकांच्या बैठकीत सांगली प्रकरणावर सखोल चर्चा झाली. पोलिस कोठडीतील मृत्यूच्या घटना टाळण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांवर पोलिस दलातील वरिष्ठांची समिती काम करणार आहे.  सांगलीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर संभाव्य कारवाईचीही चर्चा झाली. कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पोलिस महासंचालकांना पाठवलेल्या अहवालाबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

कामटेची मग्रुरीच
या प्रकरणी आरोपपत्र ९० दिवसांत न्यायालयात दाखल करण्याच्या दृष्टीने सीआयडी तपास करीत आहे. त्यासाठी यंत्रणा कसून कामाला लागली आहे. आतापर्यंत २० जणांची चौकशी आणि जबाब नोंदविलेत. मुख्य संशयित कामटेला आज चौकशीसाठी आणल्यानंतर तो तपासाला सहकार्य करीत नसल्याने स्पष्ट झाले. त्यामुळे अधिकारी त्रस्त झाले आहेत. आज त्याची एकट्याचीच सहा तास चौकशी झाली. कोथळे कुटुंबीयांना आज जबाबासाठी बोलविले नाही. या प्रकरणाच्या तपासाची नेमकी दिशा निश्‍चित झाल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला जाईल, असे सांगण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com