दंडोबावर आता तपासणी नाके

संतोष भिसे
बुधवार, 4 एप्रिल 2018

मिरज - दंडोबा डोंगरावरील गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी नाका उभारण्यात येणार आहे. डोंगरावर जाणाऱ्या प्रमुख तीन प्रवेशमार्गांच्या सुरुवातील प्रत्येकाची तपासणी करुन सोडण्यात येईल. वनविभागातर्फे ही माहीती देण्यात आली. 

मिरज - दंडोबा डोंगरावरील गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी नाका उभारण्यात येणार आहे. डोंगरावर जाणाऱ्या प्रमुख तीन प्रवेशमार्गांच्या सुरुवातीस प्रत्येकाची तपासणी करुन सोडण्यात येईल, अशी माहिती वनविभागातर्फे देण्यात आली. 

गेल्या महिन्यात दंडोबा वनीकरणात लागलेल्या आगीत काही झाडे जळाली. या पार्श्‍वभूमीवर काटेकोर तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे. मिरज-कवठेमहांकाळ तालुक्‍यांच्या सीमेवर 1 हजार 471 हेक्‍टर क्षेत्रात पसरलेल्या दंडोबा डोंगरराजीवर जाण्यासाठी अनेक पायवाटा आहेत.

त्याशिवाय सिद्धेवाडी, खरशिंग फाटा आणि गुंडेवाडी येथून तीन अधिकृत रस्ते आहेत. सांगली-मिरजकरांसाठी पर्यटनदृष्ट्या जवळची वनराई म्हणून दंडोबा लोकप्रिय आहे. गेल्या काही वर्षांत वृक्षारोपणाची मोहीम सुरु झाल्यानंतर हजारो सांगली-मिरजकरांनी दंडोबावर झाडे लावली. यानिमित्ताने डोंगरावर प्रचंड वर्दळ सुरु झाली आहे. त्याचे दुष्परीणामही दिसू लागले आहेत. 

गेल्या महिन्यात कोणाच्यातरी चुकीमुळे वीस हेक्‍टर वनक्षेत्रात आग पसरली. मोठ्या प्रमाणात झाडे जळाली. त्यानंतर वनविभागाने तपासणी नाक्‍याचा निर्णय घेतला. त्यानुसार तीन प्रमुख ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी थांबतील. डोंगरावर जाणाऱ्या प्रत्येकाचे ओळखपत्र तपासले जाईल; त्याची नोंद घेऊनच सोडले जाईल. त्याशिवाय ज्वलनशील वस्तु, आक्षेपार्ह साहीत्य नसल्याची खात्री केली जाईल. दंडोबावर काहीवेळा शिकारीच्या तक्रारीही आल्या आहेत; त्याचाही बंदोबस्त केला जाईल.

तपासणी नाक्‍याबरोबरच फिरते सुरक्षारक्षकही लक्ष ठेवून असतील. याद्वारे चोरटी शिकार, वणवे, वृक्षतोड, नासधुस यासह अन्य गैरप्रकार रोखण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे. 
वनपाल मिलींद वाघमारे यांनी सांगितले कि, यासंदर्भात वन समित्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यातील निर्णयानुसार कार्यवाही होईल.

दृष्टीक्षेपात दंडोबा
मिरज-पंढरपूर रस्त्याच्या पूर्व अंगाला मिरजेपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर दंडोबा गिरीस्थान. 1 हजार 471.54 हेक्‍टर क्षेत्र. हरोली, सिद्धेवाडी, खामकरवस्ती, मल्लेवाडी, खरशिंग, भोसे आणि डोंगरवाडी या गावांच्या थेट हद्दीवर. मालगाव, खंडेराजुरी, सोनी, बेळंकी, सलगरे ही गावे दंडोबाच्या अप्रत्यक्ष कक्षेत. दंडोबा जागृत समजले जाणारे देवस्थान डोंगराच्या सर्वोच्च स्थानी गुहेत. श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा. असंख्य जातीची झाडे व प्राणी-पक्ष्यांचे आश्रयस्थान.

चराई रोखण्याची आवश्‍यकता
डोंगरावर अनेक शेतकऱ्यांची खासगी मालकीची शेती आहे; त्यानिमित्ताने अनेक जनावरे डोंगरावर चरत असतात. नागरीकांनी लावलेल्या झाडांची यामुळे नासधुस होते. ती रोखण्याची गरज आहे. 

Web Title: Sangli News Check Post on Dandoba