सीएमसाहेब, मी कॉलेजला जाऊ की नको?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

सांगली - ‘‘मी घरातून बाहेर पडल्यापासून युवकांची टोळी माझा पाठलाग करते. गाडी आडवी मारणे, धक्का देणे, टोमणे मारणे... बस्स झालंय मला. माझा छळ मांडलाय त्या तरुणांनी. मी कॉलेजला जाऊ की नको,’’ असा सवाल वाळवा तालुक्‍यातील एका गावच्या युवतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका भावनिक पत्राद्वारे केला आहे. 

सांगली - ‘‘मी घरातून बाहेर पडल्यापासून युवकांची टोळी माझा पाठलाग करते. गाडी आडवी मारणे, धक्का देणे, टोमणे मारणे... बस्स झालंय मला. माझा छळ मांडलाय त्या तरुणांनी. मी कॉलेजला जाऊ की नको,’’ असा सवाल वाळवा तालुक्‍यातील एका गावच्या युवतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका भावनिक पत्राद्वारे केला आहे. 

‘आपल्या जिल्ह्यात लेकी सुरक्षित आहेत का?’ अशा आशयाचे चौकशीच्या सूचना देणारे एक पत्र नुकतेच जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिले आहे. ते संबंधितांपर्यंत पोचण्याआधी या युवतीने थेट मुख्यमंत्र्यांना साद घालून, ‘तुमच्या राज्यात लेकी सुरक्षित नाहीत’, असा सांगावा धाडला आहे.

ही युवती या परिसरातीलच एका विद्यालयात बारावीत शिक्षण घेते. तिचे वय १७ वर्षे आहे. ती पत्रात म्हणते, की मी सकाळी साडेदहाला कॉलेजसाठी निघते आणि सायंकाळी सहाला परत येते. या वेळी बसथांब्यावर एक तरुण आणि त्याचे मित्र मला गाडी आडवी मारतात. मला स्पर्श होईल, अशा पद्धतीने जवळ येऊन गाडी थांबवितात. घालून-पाडून बोलतात. मोठ्याने हसतात. हातवारे करतात. कधी-कधी किंचाळतात.

गेले सहा ते सात महिने हे सलग घडत आहे. कॉलेज आवारात जिप्सी भरून ते आले होते. मंदिरात पाठलाग केला. मी तक्रार दिली होती; मात्र माझ्या पालकांना विनंती करून पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, अशी ग्वाही दिली होती. वरिष्ठांनी शब्द दिल्याने आम्ही थांबलो. मात्र, गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून पुन्हा त्रास सुरू झाला आहे. मी कॉलेजला जाऊ की नको..? माझे नुकसान झाल्यास कोण जबाबदार राहणार आहे? 

या टोळक्‍यातील बहुतांश मुले सधन घरातील आहेत. त्यामुळे कुणी आपले काही करू शकत नाही, असा त्यांचा पक्का समज झाला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मला सहकार्य करावे. संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी या युवतीने पत्राद्वारे केली आहे. या पत्राची प्रत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील आणि जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनाही पाठविण्यात आली आहे.

Web Title: sangli news college girl send letter to CM