"स्थायी'च्या नव्या निवडीबाबत कॉंग्रेस- राष्ट्रवादीमध्येच संभ्रम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सांगली - येत्या 31 ऑगस्टला स्थायी समितीतील सत्ताधारी कॉंग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन सदस्यांची दोन वर्षांची मुदत संपत असल्याने त्यांच्या जागी नवे कोण याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. गतवर्षी स्थायी समिती सभापती निवडीत सत्ताधारी कॉंग्रेसला राष्ट्रवादीने दिलेला झटका पाहता यावेळी नवे सदस्य निष्ठेच्या कसोटीवर निवडले जातील. 

सांगली - येत्या 31 ऑगस्टला स्थायी समितीतील सत्ताधारी कॉंग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन सदस्यांची दोन वर्षांची मुदत संपत असल्याने त्यांच्या जागी नवे कोण याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. गतवर्षी स्थायी समिती सभापती निवडीत सत्ताधारी कॉंग्रेसला राष्ट्रवादीने दिलेला झटका पाहता यावेळी नवे सदस्य निष्ठेच्या कसोटीवर निवडले जातील. 

स्थायी समितीतील सदस्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ दिला जातो. संतोष पाटील, प्रदीप पाटील, निर्मला जगदाळे, अलका पवार, धोंडूबाई कलगुटगी व बेबीताई मालगावे असे कॉंग्रेस, तर राष्ट्रवादीचे राजू गवळी व मनगू सरगर बाहेर पडतील. ऑगस्टची नियमित महासभा रद्द झाली. त्यामुळे विशेष सभेत या निवडी होतील. मात्र तीन दिवस आधी अजेंडा प्रसिद्ध व्हावा लागतो. त्यामुळे शनिवारची सभा आता जवळपास रद्द झाली आहे. त्याऐवजी पुढील आठवड्यात सभा होऊ शकते. गणेश चतुदर्शीच्या धामधुमीतच या निवडी होतील, असे दिसते. 

गेल्यावर्षी स्थायी समितीच्या सभापतिपदी निवडीत उपमहापौर गटाने खेळी करीत कॉंग्रेसला झटका दिला. राष्ट्रवादीच्या संगीत हारगे यांना संधी मिळाली. वर्षभरात महापालिकेच्या निवडणुका आहेत. या पार्श्‍वभूमीवर कारभाराचे आणखी धिंडवडे निघू नयेत, अशी काळजी श्रेष्ठींकडून घेतली जाईल, असे दिसते. संधीच मिळाली नाही, असे मोजकेच सदस्य आता मदन पाटील गटात उरले आहेत. त्यामुळे विद्यमान काही सदस्यांना पुन्हा संधी द्यायची झाल्यास त्यात संतोष पाटील यांचे नाव आघाडीवर असेल. आता होणाऱ्या निवडी शेवटच्याच असतील. त्यानंतर थेट निवडणुकांना सामोरे जायचे असल्याने त्यात कोणाला संधी द्यायची याचा विचार करता गटनिष्ठेला प्राधान्य दिले जायची शक्‍यता आहे. गटनेते किशोर जामदार, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, रोहिणी पाटील, मृणाल पाटील व पुष्पलता पाटील, निरंजन आवटी यांना कॉंग्रेसकडून, तर राष्ट्रवादीतून युवराज गायकवाड, बाळासाहेब सावंत यांना संधी मिळू शकते. मात्र राष्ट्रवादीतील सध्या बंडाळीचे चित्र असल्याने कुणाला संधी द्यायची याचे संपूर्ण पत्ते आता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या हाती नसतील. कारण गटनेते शेडजी मोहिते यांच्या हातूनच ही नावे पुढे जातील. या दोघातील एकूण सख्य पाहता आता संधी कोणाला द्यायची यासाठी जयंत पाटील यांनाच लक्ष घालावे लागेल. 

स्वाभिमानी विकास आघाडीचे शिवराज बोळाज व सुनीता पाटील यांनी राजीनामे द्यावेत, असे आदेश गटनेते जगन्नाथ ठोकळे यांनी दिले खरे, मात्र त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी मात्र अशक्‍य आहे. पक्षाचे नेते गौतम पवार यांनीच नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने आघाडीत आणखी गोंधळ वाढला आहे.