गुन्हेगारीच्या धोकादायक वळणावर तरुणाई

गुन्हेगारीच्या धोकादायक वळणावर तरुणाई

सांगली - किरकोळ कारणातून दोघा कॉलेज युवकांनी प्रथमेश तावडे या युवकाचा भरदिवसा सहजपणे खून केला. प्रथमेशच्या खुनामुळे त्याची आई आणि बहिणीचा उद्याचा आधारच हरवला. युवकांच्या गुन्हेगारीचे हे अलीकडचे ताजे उदाहरण म्हणावे लागेल. यापूर्वी गुन्हेगारीत अडकलेल्या कॉलेज युवकाकडून खून, खुनी हल्ले आणि इतर गंभीर  स्वरूपाचे गुन्हे अनेकदा घडले आहेत. करिअरच्या उंबरठ्यावर असताना गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणाईला मागे खेचण्याची गरज आहे. 

किरकोळ चोऱ्या, मारामारी यासारख्या किरकोळ गुन्ह्याबरोबर खून, खुनी हल्ल्यातही अल्पवयीन मुले, युवक आणि तरुणाईचा सहभाग दिसू लागला आहे. सांगलीत गेल्या दहा-पंधरा वर्षांत टोळीयुद्धातून अनेक खून झाले. त्यामध्ये अल्पवयीन मुले, युवकांचा सहभाग अनेकदा दिसून आला. दहा-पंधरा वर्षांपूर्वी अल्पवयीन गुन्हेगार म्हणून पोलिस दफ्तरी नोंद असलेले आज कुख्यात गुंड म्हणून मिरवत आहेत. गुन्हेगारीच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांना योग्य ‘ट्रॅक’वर आणले नसल्यामुळे हे घडले. त्यांचाच आदर्श घेऊन गुन्हेगारी टोळ्यात मुले, युवक ओढले जात आहेत. 

शाळा, महाविद्यालयापासूनच गुन्हेगारीची सुरुवात होताना दिसते. महाविद्यालयातील विविध गुन्हेगारांचे ग्रुप्स आणि त्यांच्यातील वर्चस्वात कळत-नकळत युवक ओढले जातात. अनेकांच्या दुचाकीवर गुंडांच्या ग्रुप्सची अद्याक्षरे झळकताना दिसतात. वर्चस्वातून एकमेकांची कॉलर पकडणारेच पुढे हातात शस्त्र घेऊन अंगावर धावून  जातात. कॉलेजमधील ग्रुप्स मोडीत काढण्याची आज  खरी गरज आहे. शाळा, कॉलेजच्या बाहेर टवाळकी करणाऱ्या वेळीच पकडून त्यांच्या पालकांपुढे हजर केले पाहिजे. पोलिस दलाच्यावतीने होणारी कारवाई पुरेशी नसून कॉलेज प्रशासनाने देखील कारवाईस हातभार लावला पाहिजे. 

मुलांची गुन्हेगारीकडे वाटचाल रोखण्याची खरी जबाबदारी पालकांची आहे. मुलांचे मित्र कोण? ते कोणाबरोबर असतात? शिक्षणातील प्रगती यापासून ते सोशल मीडियावर काय करतात? याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पश्‍चात्तापाची वेळ येण्यापूर्वीच पालकांनी दक्षता घेतली पाहिजे. मुलांमधील नकारात्मकता, विचार न करण्याची प्रवृत्ती नसणे, परिस्थितीचे आकलन न होणे हा सध्याच्या पिढीमधील महत्त्वाचा दोष आहे. नकार पचवण्याची ताकद मुलांमध्ये निर्माण  केली पाहिजे. 

रागाने का बघितलेस? यासारख्या क्षुल्लक कारणातून देखील खून होऊ लागले तर भविष्यातील गुन्हेगारी आणखी भयावह असू शकते. सांगलीतील गुन्हेगारीचा इतिहास पाहिला तर गुंडगिरीचा शेवट हा वाईटच असतो  हे अनेक घटनातून दिसून आले. तरीही युवकांमधील गुन्हेगारीचे आकर्षण कमी झाले नाही हे समाज  व्यवस्थेचे अपयशच म्हणावे लागेल.

अनेक युवकांमध्ये विचार करण्याची क्षमता नसते. मानसिक आरोग्य भयावह असते. अशा मुलांना नकारात्मक गोष्टींचे खतपाणी तत्काळ मिळते. विचारातील दोष दूर करण्याचे प्रशिक्षण कोठेच मिळत नाही. त्यामुळे सहजपणे गुन्हे घडतात. परिस्थितीचे आकलन होत नाही. विचार दोष दूर करण्यासाठी आकार फाऊंडेशन कार्यरत आहे. फाऊंडेशन शाळा, महाविद्यालयाबरोबर चौकाचौकांत विनाशुल्क कार्यक्रम आयोजित करू शकते. पालकांना पाल्यांमधील दोष दूर करण्यासाठी फाऊंडेशन मार्गदर्शन करते.
- डॉ. प्रदीप पाटील (समुपदेशक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com