‘भ्रष्टाचार रोखणे स्टंटबाजी असेल तर ती करूच’

‘भ्रष्टाचार रोखणे स्टंटबाजी असेल तर ती करूच’

सांगली - तुमच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनाम्यासाठी आमची पोलखोल मोहीम सुरूच राहील. त्याला तुम्ही स्टंट म्हणत असाल तर तो आम्ही करीतच राहू. हिंमत असेल तर तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करून दाखवाच, असे आव्हान जिल्हा सुधार समितीच्या वतीने देण्यात आले.

सह्याद्रीनगरच्या रस्त्याच्या कामातील उघडकीस आणलेल्या भ्रष्टाचारावरून महापौरांनी टीका केल्याने समितीचे कार्याध्यक्ष ॲड. अमित शिंदे व प्रा. आर. बी. शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.

ते म्हणाले, ‘‘आमचे काय चुकले? गेली साडेचार वर्षे रस्ते खराब असल्याचे महापौरांना दिसले नाही? रोड रजिस्टर करण्याची आम्ही गेले चार वर्षे मागणी करत आहोत. त्याबाबतही त्यांनी कारवाई केली नाही. विद्यमान आयुक्तांनीही तेच केले. आयुक्तांनी रस्ते कामांवर लक्ष ठेवा असे जाहीरपणे सांगितले आहे. अधिकारीच काम दर्जेदार नसल्याचे सांगत असताना महापौर फौजदारीची भाषा कशी काय करतात. कामाचा दर्जाचा यथावकाश पंचनामा होईलच. मात्र आम्ही ठेकेदाराला काही प्रश्‍न विचारले. त्यात कच्चा मालाचा डेपो मारला आहे का, स्टॉक मेजरमेंट घेतली आहेत का, कामाच्या माहितीचा फलक लावला आहे का असे निविदा अटीत नमूद माहिती विचारली असता यातले काही एक तो दाखवू शकला नाही. एक चौरस मीटर जागेत अडीच किलो डांबर वापरले पाहिजे. प्रत्यक्षात अर्धा लिटर डांबरही आढळले नाही. सावंत यांनी काम बंद पाडल्यानंतर पुन्हा ते सुरू झाले होते हे महापौरांनी लक्षात घ्यावे. बनावटपणा उघड करणे गुन्हा ठरत नाही. त्यावर फौजदारी कारवाईची भाषा करून महापौर बालिशपणा सिद्ध करीत आहेत.  महापौरांना चाड असेल तर उद्या सकाळी १० वाजता सह्याद्रीनगर येथे येऊन समक्ष कामाची पाहणी करावी आणि काम कसे चालू आहे ते जाहीर करावे.’’ 

नगरसेवक पाटील यांचे मौनच : हडदरे 
कामाच्या दर्जाबाबत स्थानिक नागरिक सुशील हडदरे यांनी तक्रार केल्यानंतर नगरसेवक संतोष पाटील यांनीच पुढे येऊन सावंत यांना सूचना दिल्या. त्यानंतर काम बंद ठेवण्यात आल्याचा दावा महापौरांनी केला होता. त्याला स्थानिक नागरिक व व्यापारी सुशील हडदरे यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘‘आठ दिवसांपूर्वीच आयुक्तांकडे तक्रार केली होती. उपोषणाचा इशारा दिला होता. नगरसेवक संतोष पाटील यांनाही कल्पना दिली. ते आले. मात्र तरीही काम सुरूच होते. त्यामुळे आयुक्तांना फोन केल्यानंतर पालिकेचे अधिकारी सतीश सावंत आले. त्यांच्या आदेशानेच काम बंद पडले. महापौर दिशाभूल करीत असल्याबाबत आजच मी त्यांना सांगितले आहे.’’

स्टंटबाजी कराल तर फौजदारी करू - शिकलगार

जिल्हा सुधार समितीने निवडणुका समोर ठेवून सुरू केलेली स्टंटबाजी लोकांच्या लक्षात आली आहे. त्यांनी दर्जेदार रस्त्यांसाठी जरूर आग्रह धरावा; मात्र प्रसिद्धीसाठीचा खटाटोप टाळावा, असा सल्ला महापौर हारुण शिकलगार यांनी दिला. 

ते म्हणाले, ‘‘सह्याद्रीनगर येथील रस्त्याच्या दर्जाबाबत सुधार समितीच्या नेत्यांनी सुरू केलेली स्टंटबाजी रस्त्यांच्या कामात आडकाठी आणणारी आहे. त्यांनी रस्त्यांच्या दर्जासाठी आग्रही राहावे. सर्वच नागरिकांनी कामांबाबत दक्ष राहावे, असे आवाहन आम्ही आणि आयुक्तांनी यापूर्वीच केले आहे. कामांचा दर्जा योग्य नसेल तर प्रशासनाने जरूर हस्तक्षेप करून ठेकेदाराला समज द्यावी. प्रसंगी त्यांची बिले रोखावीत. मात्र हेतूपूर्वक कोणी कामे बंद पाडत असेल तर त्यांच्यावर फौजदारीची कारवाईदेखील करावी.’’

ते म्हणाले, ‘‘सह्याद्रीनगरातील कामाची तक्रार येताच नगरसेवक संतोष पाटील यांनी धाव घेतली. त्यानंतरच आयुक्तांनी दखल घेतली आणि ठेकेदाराला काम बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या; मात्र सुधार समिती त्याचेही भांडवल करून प्रसिद्धी मिळवत आहे. महत्‌प्रयासाने कामे सुरू झाली आहे. राजकारणासाठी लोकांना त्रास देऊ नका.’’

ते म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी शंभर फुटीजवळ काही गल्ल्यांमध्ये क्राँक्रिटकरणाची कामे सुरू होती. तेथील ठेकेदाराचा मला फोन आला. सुधार समितीची काही मंडळी कामात अडथळे आणत आहेत, असे त्यांनी सांगितले. मी तत्काळ तिथे गेलो असता त्या तरुणांनी  पळ काढला. मी त्याचाही शोध घेतला असता सुधार समितीच्या नावाने तिसऱ्याच काही मंडळींनी हा उद्योग मांडल्याचे लक्षात आले. समितीच्या नेत्यांनी आपल्या नावाने काय सुरू आहे हेही पाहावे. अन्यथा जनता तुम्हालाही माफ करणार नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com