उमदीकरांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

जत -  संख येथे अप्पर तहसील कार्यालय करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ उमदीकरांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला. शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असल्याने कुणीही उमेदवारी अर्ज भरायचा नाही, असा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. 

जत -  संख येथे अप्पर तहसील कार्यालय करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ उमदीकरांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला. शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असल्याने कुणीही उमेदवारी अर्ज भरायचा नाही, असा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. 

याबाबतची माहिती अशी, जत तालुक्‍याचे विभाजन करून उमदी हा स्वतंत्र तालुका करण्याची मागणी शासनदरबारी पडून आहे. शासनाने तूर्त जनतेच्या सोयीसाठी अप्पर तहसील कार्यालय करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही हरकती न घेता तसेच जनतेच्या भावनांचा विचार न करता परस्पर दडपशाहीने संख येथे अप्पर तहसील कार्यालय करण्याचे जाहीर केले. त्यामुळे या निर्णयाचे जत पूर्व भागात स्वागत न करता उमदीसह अनेक गावांनी आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविला. तसेच तालुका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी शासनाच्या या बेकायदेशीर निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

उच्च न्यायालयाने उमदीकरांना न्याय देत अप्पर तहसील कार्यालयाबाबत दोन आठवड्यांत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव यांना दिले. तसेच राज्य शासनाने सारासार विचार करून योग्य त्या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय करून कोर्टाला तीस दिवसांच्या आत अहवाल सादर करावेत, असेही सांगितले आहे. त्यानंतर शासनाचा निर्णय योग्य न वाटल्यास उमदीकरांना पुन्हा कोर्टात दाद मागण्याची मुभा दिली आहे. 

उमदी आणि संखमध्ये रूढी व परंपरेनुसार वाद, मतभेद असून याबाबत तहसीलदार, जत यांनी अनेक वेळा शासनाला लेखी कळविले आहे. उमदीचे नागरिक संख येथे पाणीदेखील पीत नाहीत; मात्र संखमधील लोकांना उमदीत येण्यास, पाणी पिण्यास, राहण्यास काही अडचण नाही, ही अंधश्रद्धा वाटत असली तरी श्रद्धेची बाब आहे, हे सर्व संख व उमदीकर जाणतात. असे असताना शासनाने बेधडक कोणताही विचार, हरकती न घेता परस्पर बेकायदेशीर संख येथे अप्पर तहसील कार्यालय करण्याचे आदेश दिले, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी येथे तातडीने सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आठवड्यात होणाऱ्या उमदी ग्रामपंचायत निवडणुकीत कुणीही उमेदवारी फॉर्म भरायचे नाहीत, असा एकमताने ठराव करून निर्णय घेण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चन्नप्पाण्णा होर्तीकर, सरपंच निसार मुल्ला, रामू कोळगिरी, मल्लप्पा सालुटगी, रवी शिवपुरे, काँग्रेसचे निवृत्ती शिंदे, रमेश हळके, सुरेश कुल्लोळी, बंडा शेवाळे, मानसिद्ध पुजारी, भाजपचे संजयकुमार तेली, राजकुमार चव्हाण, चिदानंद रगटे, शिवसेनेचे सुरेश माळी, तालुका पाणी संघर्ष समितीचे सुनील पोतदार, अनिल शिंदे, महम्मद कलाल, तसेच दावल शेख उपस्थित होते.

 

Web Title: sangli news grampanchayat election