नवेखेडला हुतात्मा विरुद्ध राष्ट्रवादी

शामराव गावडे
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

नवेखेड -  नवेखेड येथे ग्रामपंचायत निवडणुकीत हुतात्मा विरुद्ध राष्ट्रवादी, असा पारंपरिक सामना रंगला आहे. सरपंच पद खुल्या गटासाठी असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे.

नवेखेड -  नवेखेड येथे ग्रामपंचायत निवडणुकीत हुतात्मा विरुद्ध राष्ट्रवादी, असा पारंपरिक सामना रंगला आहे. सरपंच पद खुल्या गटासाठी असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे.

यापूर्वीच्या सर्व निवडणुका हुतात्मा विरुद्ध राष्ट्रवादी अशाच लढल्या जातात. दोन्ही गटांनी आलटूनपालटून यापूर्वी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली गेली. १५ दिवस सरपंच पदाचा उमेदवार निश्‍चित करण्यासाठी दोन्ही गटात कार्यकर्त्यांची चढाओढ सुरू होती. हुतात्मा गटाचा उमेदवार कार्यकर्त्यांशी चर्चा करून वैभव नायकवडी  यांनी निश्‍चित केला आहे. तर दुसरीकडे आमदार जयंत पाटील यांनीही तशाच पद्धतीने राष्ट्रवादी सरपंच पदाची उमेदवारी निश्‍चित केली. 

नाराज असणाऱ्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाची समजूत काढण्यात आली आहे. तरीही धुसफूस कायम आहे. अशा परिस्थितीत दोन्ही गट समोरासमोर आले आहेत. गट, तट, भावकी, समाज असे आडाखे बांधले जात आहेत. राष्ट्रवादीकडून सरपंच पदासाठी प्रदीप चव्हाण हे उमेदवार आहेत. 

चव्हाण यांनी यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले आहे. हुतात्मा गटाकडून विलासराव जाधव हे उमेदवार आहेत. जाधव यांनीही यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य, हुतात्मा कारखान्याचे संचालक म्हणून काम केले आहे. 

दोन्ही उमेदवारांना सार्वजनिक कामाचा अनुभव आहे. तिसरे पॅनेल म्हणून निवडणुकीत उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या निवडणुकीतून माघार घेतली. एकूण बारा जागांसाठी २४ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही गटांतील उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. 

दोन दिवसात अधिकृत प्रचाराचा नारळ फुटेल. राष्टवादी सत्ता कायम राखण्यासाठी तर हुतात्मा  राष्ट्रवादीची सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रयत्नशील आहे. राष्टवादी कडून सर्वश्री डी. बी. पाटील, रवींद्र चव्हाण, नेताजी चव्हाण, शामराव पवार, बी. आर. पाटील, तर हुतात्माकडून सर्वश्री विठ्ठल गुंजवटे, अशोक जाधव, किरण चव्हाण, जयकर चव्हाण, प्रकाश जाधव, हेमंत कदम, निवास नायकवडी, रवींद्र थोरात हे प्रयत्नशील आहेत.