गावागावांतले गड वाचविण्यासाठी संघर्ष

गावागावांतले गड वाचविण्यासाठी संघर्ष

सांगली -  मिरज तालुक्‍यात भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीची लढत, वाळवा तालुक्‍यात नेतेमंडळींच्या गटांनी निर्माण केलेले आव्हान, शिराळा तालुक्‍यात देशमुख-नाईक गटांतील चुरस, पलूस तालुक्‍यात काँग्रेस विरुद्ध भाजप आणि कडेगावात कदम विरुद्ध देशमुख असा पारंपरिक संघर्ष या भागात दिसून येत आहे.

निवडणूक ग्रामपंचायतींची परंतु तयारी विधानसभेची असेच चित्र नेतेमंडळींनी निर्माण केले  आहे. घर टू घर प्रचाराबरोबर ग्रामीण भागात सोशल मीडियावर देखील प्रचार रंगला आहे. जिल्हा परिषदेवर भाजपने झेंडा फडकवल्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या  नेत्यांपुढे आता आपापल्या मतदार संघातील गावे शाबूत ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र असून  सोशल मीडियातून व्यक्‍त होत असलेल्या नाराजीला तोंड कसे द्यायचे ? असा प्रश्‍न भाजप कार्यकर्त्यांपुढे आहे.

मिरज 
काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपने करिश्‍मा दाखवला. पंचायत समितीच्या दहा आणि जिल्हा परिषदेच्या चार जागा भाजपने जिंकल्या. आता ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्‍यातील ३८ गावात भाजपने कंबर कसली आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. राजकीय चिन्हावर निवडणूक लढवली जात नसली तरी पक्षांनी पुरस्कृत पॅनेलमध्ये लढती आहेत. ग्रामीण भागात कोणाचे वर्चस्व आहे? हे दाखवणारी ही लढत आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार सुरेश  खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासाठी लढत  प्रतिष्ठेची ठरणार आहे.
आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन भाजपने पूर्व भागातील बेडग, गुंडेवाडी, बोलवाड, खटाव, कदमवाडी, खंडेराजुरी, बेळंकी, सावळी, टाकळी, सलगरे, वड्डी, संतोषवाडी, पाटगाव, सिद्धेवाडी, पायापाचीवाडी,  सोनी या गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. एक-दोन गावांतील अपवाद वगळता काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत आहे. पश्‍चिम भागातील माधवनगर, बुधगाव,  हरिपूर येथे भाजपची ताकद आहे. दुधगाव, हरिपूर, जानराववाडी, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, कानडवाडी, खरकटवाडी, काकडवाडी, बुधगाव, बिसूर, माधवनगर, मौजे डिग्रज, माळवाडी, मानमोडी, नरवाड, नांद्रे, सावळवाडी, समडोळी, पद्माळे, रसुलवाडी, सांबरवाडी, बामणोली येथे काँग्रेस आणि इतर आघाड्या एकत्र  आहेत. राष्ट्रवादीचीही या भागात मोठी ताकद आहे. 

   शिराळा 
तालुक्‍यात ६० पैकी दहा ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात नेतेमंडळींना यश आले आहे. काँग्रेसने पाच, राष्ट्रवादीने ३, तर भाजपने दोन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवून सलामी दिली आहे. आता उर्वरित ५० ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवण्यासाठी माजी विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख, आमदार  शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गटात चुरस रंगली आहे. महाडिक गटाने स्थानिक राजकारण लक्षात घेऊन युती केली आहे.
तालुक्‍यात निवडणूक ग्रामपंचायतीची असली तरी तयारी मात्र विधानसभेची असल्यासारखे चित्र दिसत आहे. तालुक्‍यातील मणदूर, आरळा, येळापूर, कांदे, बिऊर, मांगले, देववाडी, सागाव, बिऊर आणि इतर मोजक्‍या गावांत चुरस निर्माण झाली आहे. दहा ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात यश आले आहे. परंतु इतर ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी तीन प्रमुख गटांमध्ये चुरस आहे. भाजप प्रणित आघाडीने तीन गावांत राष्ट्रवादीला घेऊन काँग्रेससमोर आव्हान उभे केले आहे. तर तीन गावांत काँग्रेसला घेऊन राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले आहे. विधानसभा आणि जिल्हा परिषद,  पंचायत समितीपेक्षा गावपातळीवर राजकारणाची गणिते वेगळी असल्याचे दिसून येत आहे.

वाळवा
आमदार जयंत पाटील, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह नायकवडी, महाडिक, शिंदे यांच्या प्रमुख गटासह  स्थानिक गटांमध्ये तालुक्‍यात ८२ ग्रामपंचायतींमध्ये  लढत होत आहे. त्यामुळे तालुक्‍यात राजकीय पक्ष किंवा नेत्यांऐवजी स्थानिक गटांनी निवडणूक चुरशीची बनवली आहे.
तालुक्‍यातील कासेगाव, वाटेगाव, नेर्ले, भवानीनगर, रेठरेहरणाक्ष, ताकारी, बहे, साखराळे, रेठरेधरण, ऐतवडे बुद्रुक, चिकुर्डे, कुरळप, ऐतवडे खुर्द, नवेखेड, गोटखिंडी, बावची, बागणी आदी मोठ्या ग्रामपंचायतींसह ८२ ग्रामपंचायतींमध्ये चुरशीचे चित्र दिसत आहे. 

    पलूस 
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील यशानंतर भाजपने १६ ग्रामपंचायतींमध्ये झेंडा फडकवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा खेचून आणण्यासाठी आमदार पतंगराव कदम यांनी अनुभव पणाला लावला आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम, अरुण लाड, शरद लाड आदी नेतेमंडळींनी प्रचारात चुरस निर्माण केली आहे.
तालुक्‍यातील कुंडल, बांबवडे, घोगाव, सांडगेवाडी, सावंतपूर, दुधोंडी, पुणदी तर्फ वाळवा, पुणदीवाडी, बुर्ली, अंकलखोप, हजारवाडी, वसगडे, खटाव, सुखवाडी, चोपडेवाडी, ब्रह्मनाळ या गावात निवडणूक होत आहे. पुणदीवाडीत फक्त सरपंच आणि दोन सदस्यपदासाठी निवडणूक लागली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपने यश मिळवल्यामुळे आमदार कदम गटाने नेटाने प्रचारास सुरवात केली आहे. तर विधानसभेची रंगीत तालीम म्हणून संग्रामसिंह देशमुख गटाने पुन्हा एकदा ताकद आजमावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कदम, देशमुख आणि लाड गटांनी निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

   कडेगाव 
तालुक्‍यात ४२ ग्रामपंचायतींसाठीचा प्रचार अंतिम  टप्प्यात आला आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप नव्हे तर कदम विरुद्ध देशमुख गटाचा पारंपरिक संघर्ष निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने ताकद दाखवली. त्यामुळे संग्रामसिंह देशमुख यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. आगामी विधानसभा निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यांची लढत आमदार पतंगराव  कदम किंवा प्रसंगी विश्‍वजित कदम यांच्याशी असणार आहे. त्यामुळे देशमुख गटाने विधानसभेची रंगीत तालीम समजून प्रचाराचे रान उठवले आहे. तर जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील पराभवाचा वचपा काढून आगामी विधानसभा निवडणुकीत आपण कसे सुरक्षित आहोत हे दाखवून देण्यासाठी आमदार कदम बंधू, विश्‍वजित कदम यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com