भाजपचे वारे सांगलीत गावगाड्यात शिरले...पण?

भाजपचे वारे सांगलीत गावगाड्यात शिरले...पण?

मोदी लाट संपली असल्याचे विरोधक घसा ओरडून  सांगत होते. नोटाबंदी, पाठोपाठ जीएसटीनंतरची व्यापाऱ्यांची सरकारविरोधी मानसिकता दिसू लागली होती. शेतकरी सरकारवर नाराज असल्याचेही चित्र होते. आणि सोशल मीडियावरील वातावरण पाहता मोदी  लाटेला ओहोटी लागल्याचे दावे केले जात होते. असे वातावरण असताना भाजपला ग्रामीण मतदार जवळ  करणार काय, असा प्रश्‍न उपस्थित होत होता. पण ग्रामपंचायतच्या परीक्षेत डिस्टिंक्शन नसलं तरी पण फर्स्ट क्‍लासमध्ये बीजेपी पास झाल्याचं दिसतंय! अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रगतिपुस्तकही सुधारल्याने नेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींसाठी सुमारे ८ लाख मतदारांनी आपले मत नोंदवून गाव कारभारी निवडले. या वेळी जनतेने प्रथम थेट सरपंचही निवडला. त्यामुळे प्रभागातल्या प्रत्येक मतदाराच्या मताला दुहेरी मोल होते. गावातल्या निवडणुकीचे संदर्भ गावकीतलेच असतात. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचे मूल्यमापन या निवडणुकीच्या निकालातून करण्याची घाईच ठरेल. तरीही अशी तुलना अटळच. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावरही सडकून टीका सुरू आहे... नुकताच नांदेडच्या पालिकेचा निकाल आला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर भाजप लक्ष्य होत आहे. त्यामुळे तुलना अटळ. 

कडेगावातून पतंगराव कदमांनी लगेचच भाजपचा तालुक्‍यातून सुपडासाफ केल्याचा दावा केला. त्यांच्या तालुक्‍यात जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागलेला. पण ते गावांच्या मैदानात जिंकले. वाळव्यात जयंत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील फाटाफुटीचा नेमका फायदा उचलला.

आष्टा पंचक्रोशीतील गावात त्यांना काहीसा झटका  बसला. त्यांनी आपले मतदारसंघ सावरले. खरे तर एकदा अपेक्षा वाढल्या की त्या टप्प्यावर जाऊनच विचार केला जातो. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांमधील भाजपच्या लाटेमुळे या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यामुळे या निकालाचे मूल्यमापन करताना भाजपची लाट रोखल्याचे चित्र पुढे आले. मात्र संपूर्ण जिल्ह्यातील सर्व निकाल पाहिले तर भाजपला फायदाच झाला. कारण भाजपचे जे काही यश असेल ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची वजाबाकीच असेल. यापूर्वी आटपाडीचे राजेंद्रअण्णा, तासगावचे संजयकाका, कडेगावचे पृथ्वीराजबाबा आणि जतचे विलासराव अशी सारीच मंडळी राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे तालुका शिलेदार. हे सारे आयात नेते आता भाजपमध्ये स्थिरावले असल्याने त्यांचे जे काही यश ते भाजपचेच. त्यांनी भाजपच्या पदरात चांगले दान टाकले आहे. अर्थात पूर्वी हीच बेरीज राष्ट्रवादीत होती. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीतून आऊटगोईंग मोठे असल्याने त्यांना विधानसभेनंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये फटका अटळ होता. राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर गेली तरी ते फारसे अनपेक्षित नाही. त्यामुळेच भाजपचा विजय अपेक्षित होता.

कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात सध्या काँग्रेसचा फक्त एकच आमदार आहे. तेच जिल्ह्याचे नेते आहेत. वसंतदादा घराण्याच्या ताब्यातील सत्तास्थानांची गळती आता पद्माळे गावच्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचली आहे. तिथं राष्ट्रवादी सत्तेत आली आहे. मदन पाटील यांच्या पश्‍चातील ही पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक आहे. प्रतीक व विशाल पाटील यांचा फारसा सहभाग या निवडणुकीत नव्हता. जिंकतील  ते आपले असे त्यांचे पूर्वापार धोरण नव्या संदर्भात कितपत चालेल हे काळच ठरवेल.

मिरज तालुक्‍यातील हरिपूर-माधवनगरसारख्या दोन मोठ्या ग्रामपंचायती भाजपकडे आहेत. अन्यत्र स्थानिक आघाड्या काँग्रेस, राष्ट्रवादीने आपल्या सत्ता राखल्या आहेत. मिरज तालुक्‍यात आपल्या मतदारसंघातील दोन महत्त्वाचे गड गाडगीळांनी आपल्या ताब्यात ठेवले. खाडेंनीही आपला भाग राखला; तर संजयकाकांनी येथे आपला स्वतंत्र गटही निर्माण करण्यात यश मिळविले.

देशमुखांकडे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेची सर्व सूत्रे असतानाही ग्रामपंचायतीत त्यांची पीछेहाट झाली आहे. कदम बंधूंनी येथे डोळ्यात तेल घालून पूर्ण ताकद लावल्यानेच भाजपचा येथे सुपडासाफ झाला आहे. विशेष म्हणजे खानापूरमध्येही सदाशिवरावांना गावांनी साथ दिली आहे. ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या असताना आणि  ग्रामीणमध्ये बाबरांचे वर्चस्व असतानाही त्यांनी परीघ वाढविला आहे. सेनेलाही पहिल्यांदा ३५ ग्रामपंचायतींवर भगवा फडकवायला मिळाला आहे त्यात बाबरांचा वाटाच अधिक आहे. जतमध्ये काँग्रेसने बलाढ्य जगतापांशी चांगली टक्‍कर दिली आहे. अर्थात येथे बीजेपीच नंबर वन असल्याचा जगतपांचा दावा विक्रम सावंतना आव्हान देणाराच आहे. मात्र जतमध्ये बसवराज पाटील, संतोष पाटील, आकाराम मासाळ, प्रकाश जमदाडे आदी दिग्गज नेत्यांच्या गावांनीच त्यांना नाकारल्याचे धक्‍कादायक निकाल पहायला  मिळाले. 

या निवडणुकीत तासगावात संजयकाकांनी शहराबरोबरच ग्रामीण भागातही आपला बेस तयार करतानाच मतदारसंघाबाहेरही लक्ष घालून स्वत:च्या बळावर परीघ वाढवला आहे. कवठेमहांकाळमध्ये मात्र अजितराव घोरपडे यांनी बंडखोर बाणा कायम ठेवताना भाजपला दूर लोटताना राष्ट्रवादीस विरोधकांना सोबत घेतले. तासगावमध्येही त्यांनी राष्ट्रवादीशी जुळवून घेतले. 

गेल्या तीन वर्षांतील सत्ताबदलाचा अनुभव जनतेने घेतला आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा या बेल्टमध्ये ग्रामपंचायतीचे निकाल पाहता. अन्य तीन जिल्ह्यांत  भाजप पूर्ण पिछाडीवर गेली आहे. त्या तुलनेत  जिल्ह्यातील भाजपचे यश मात्र उठावदारच. खुद्द महसूलमंत्री चंद्रकांतदादांनाही कोल्हापूर जिल्ह्यात फार यश मिळालेले नाही. गावच्या गल्लीबोळात भाजपचे वारे शिरले हे मात्र सत्य आहे. मात्र ते वारेच आहे. ते कायम टिकेल याची खात्री मात्र द्यायला नको.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com