घरपट्टीला जोडली पाणीपट्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

सांगली - घरपट्टीला पाणीपट्टी जोडण्याचा तुघलकी ठराव येत्या महासभेसमोर मांडण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक युवराज गायकवाड यांनी एक ज अन्वये महासभेसमोर हा विषय आणला असून, त्याला मंजुरी मिळाल्यास महापालिका क्षेत्रातील प्रत्येक स्वतंत्र मालमत्ताधारकाला सरसकट दोन हजार रुपयांची पाणीपट्टी लावली जाईल. दरम्यान, यासाठी खासगी कर्मचाऱ्यांची पथके नियुक्त करण्याचा डाव असल्याचा आरोप स्वाभिमानी विकास आघाडीचे सचिव सतीश साखळकर यांनी केला.

घरपट्टीला पाणीपट्टी जोडण्याचा जुनाच मनसुबा आहे. बिलांचे वाटप वेळत होत नाही. मीटर रीडिंग घ्यायला पुरेसे रीडर नाहीत. मीटर दुरुस्ती होत नाही, त्यातच गोलमाल होतो, अशा नाना कारणांमुळे पाणीपट्टी वसुली होत नाही. यावर उपाय म्हणून सरसकट सव्वा लाख मालमत्ताधारकांच्या घरपट्टीला पाणीपट्टीचे सरसकट दोन हजार रुपये बिल जोडायचे म्हणजे एकाच वेळी बिल वाटप आणि वसुली होईल, असा उफराटा विचार काही नगरसेवकांच्या मनी आला. त्यानुसार युवराज गायकवाड यांनी हा प्रस्ताव दिला आहे.

मुळात पाणी मोजून दिले पाहिजे. जो वापरणार त्याच्याकडून वसुली झाली पाहिजे. त्याऐवजी दोन हजार रुपये भरा आणि वारेमाप पाण्याची उधळपट्टी करा, असाच संदेश या नव्या नियमातून दिला जात आहे. अनेक अपार्टमेंटधारक फक्त पिण्याच्या पाण्यापुरतेच महापालिकेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यांनी कच्च्या वापरासाठी कूपनलिका खोदल्या आहेत. 

शहरात कूपनलिकांना पाण्याची अजिबात टंचाई नाही. शामरावनगरसह विस्तारित भागात तर पाच-दहा फुटांवर पाणी आहे. अशा परिस्थितीत केवळ रोजच्या चार-दोन घागरींसाठी वर्षाला दोन हजारांचा भुर्दंड नागरिकांनी का सोसायचा? शासनाने पाणी मोजूनच दिले पाहिजे, असे अनेक दंडक अनुदान देताना घातले आहे. या ठरावाद्वारे हे दंडकच मोडीत निघणार आहेत. 

दरम्यान पाणी वाटपाचे पडद्याआडचे खासगीकरणच आहे, असा आरोप श्री. साखळकर यांनी केला. ते म्हणाले, ‘‘ठेका देऊन बिल वाटप करण्याचाच हा डाव आहे. त्यातून नागरिकांवर अन्याय होणार आहे. यापूर्वीच्या अशा प्रयत्नांमुळे महापालिकेचा मोठा तोटा झाला आहे. आम्ही असे काही होऊ देणार नाही. याविरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन केले जाईल.’’