पंच गेले पुजारी आले; ‘कौल’ मिळेना, विवाह होईना

धर्मवीर पाटील
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

इस्लामपूर - डोंबारी-कोल्हाटी समाजाने अतिशय पुरोगामी निर्णय घेत जातपंचायतीला मूठमाती दिली; मात्र आता या समाजातील लोक नव्या चक्रव्यूहात अडकू लागलेत. पुजाऱ्यांच्या वाढत्या प्रस्थामुळे समाज पुन्हा गर्तेत सापडला आहे. त्यात एका तरुणीची फरफट होत असून तिच्या विवाहाला पुजाऱ्यांकडून अडीच वर्षे कौल मिळत नसल्याने कार्य थांबले आहे. काही ना काही कारण सांगून या विवाहात पुजारी बाधा आणत आहेत, अशी कुजबूज नव्या बदलाची ठिणगी बनू पाहत आहे. 

या भागात या समाजाची अवस्था ‘पंच गेले अन्‌ पुजारी आले’, अशी झाली आहे. पारंपरिक जोखंडातून समाज मुक्‍त होऊ पाहत असताना नव्या समस्या डोईजड होताहेत. अडीच वर्षांपूर्वी इस्लामपूर, आष्टा परिसरांत सुशिक्षित युवक, उत्साही कार्यकर्त्यांमुळे डोंबारी-कोल्हाटी समाजातील जातपंचायत उजेडात आली. पंचांनी ‘जातपंचायत प्रथा बंद करीत आहोत, प्रत्येकजण स्वतंत्र निर्णय घेऊ शकतो’, असे जाहीर केले. हा मोकळा श्‍वास अजून घेतला नाही तोवर नव्या समस्येने डोके वर काढल्याचे चित्र समोर आले आहे. 
जातपंचायत प्रक्रियेत महत्त्वाचा घटक असलेले ‘पुजारी’ पंचांच्या जागी बस्तान बसवत आहेत, असा संताप कोल्हाटी-डोंबारी समाज एकता संघटनेचे प्रकाश मोरे व रमेश मोरे यांनी व्यक्त केला आहे.

पुजाऱ्यांना विचारल्याशिवाय कोणतेही धार्मिक अथवा मंगलकार्य न करण्याचा अलिखित फतवाच आहे. हे पुजारी ‘कौल’ देतात. ‘देवीची पूजा’ लावतात. एक विधवा महिला मुलीचा विवाह लावण्यासाठी दोन-अडीच वर्षे एका पुजाऱ्याकडे हेलपाटे मारत आहे. हा पुजारी त्याच्या सोयीने ‘आज नको, आता नको, समाजातील अमक्‍याचे लग्न होऊ दे मग बघू’ अशी कारणे देत विवाह लांबवतोय. 

पुजारी ‘देवीच्या साक्षी’ ने हा कौल लावत असल्याने तो नाकारणे, टाळणे कुटुंबाला जड जातेय.  या प्रकाराला दोन्ही बाजूचे कुटुंबीय वैतागलेत. संभाव्य धोके विचारात घेऊन लग्न करण्याचे धाडस मात्र होत नसल्याचे सांगितले जातेय. 

जातपंचायत प्रथेने समाज अनेक वर्षे मागे राहिलाय. पुजारी प्रथेने पुन्हा तेच होत आहे. लादल्या गेलेल्या प्रथा समाजाने झुगारून दिल्या पाहिजेत.
- रमेश जावळे (इस्लामपूर)

मुलगा व मुलीकडील दोघेही लग्नाला तयार असताना पुजाऱ्याने लग्न थांबवणे गैर आहे. कायद्याचा धाक दाखवून प्रथा मुळातून उखडली पाहिजे. पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालावे. अन्यथा संघटना आंदोलन करेल.
-रमेश मोरे, प्रकाश मोरे
(आष्टा),
पदाधिकारी (कोल्हाटी-डोंबारी समाज एकता संघटना).

पुजारी प्रथेला ‘अंनिस’चे जातपंचायतविरोधी अभियान पूर्ण विरोध करेल. ही प्रथा चालू देणार नाही. तथाकथित पुजाऱ्यांचा भांडाफोड करू.
- प्रा. सतीश चौगुले,
कार्यकर्ते, ‘अंनिस’

Web Title: Sangli News Kolhati dombari cast new problems