कृष्णा प्रदूषित; पालिकेला नोटीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

सांगली - कृष्णा नदीत प्रक्रिया न करता मलमूत्र सोडले जात असल्याप्रकरणी सुधार समितीच्यावतीने प्रा. आर. बी. शिंदे यांनी वैयक्तिक महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. महिन्याच्या कालावधीत कारवाई केली नाही तर हरित न्यायालयात दाद मागण्याचा इशारा प्रा. शिंदे यांनी दिला आहे.

सांगली - कृष्णा नदीत प्रक्रिया न करता मलमूत्र सोडले जात असल्याप्रकरणी सुधार समितीच्यावतीने प्रा. आर. बी. शिंदे यांनी वैयक्तिक महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. महिन्याच्या कालावधीत कारवाई केली नाही तर हरित न्यायालयात दाद मागण्याचा इशारा प्रा. शिंदे यांनी दिला आहे.

कृष्णा नदीत ड्रेनेजचे पाणी राजरोस सोडले जात आहे. कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता मलमूत्र गटारीतून नदीत मिसळले जात आहे. त्यामुळे कृष्णेची अक्षरश: गटारगंगा झाली असून, नदी प्रदूषित होऊन जलचरांना धोका निर्माण झाला आहे. तसेच नागरिकांचे आरोग्यही धोक्‍यात आले आहे. शेरीनाल्याचा प्रश्‍नही अद्याप सुटला नाही. शेरीनाल्यातून उचललेले पाणी शेतकरी आहे, तसेच वापरतात. कृष्णा नदीतील पाणी दूषित झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या  तपासणीत स्पष्ट झाले आहे. परंतु महापालिकेला इशारा देण्यापलीकडे त्यांच्याकडून कोणतीही कारवाई  होत नाही. केवळ नोटीस पाठवून ‘पोस्टमन’ची भूमिका प्रदूषण नियंत्रण मंडळ पार पाडत आहे. 

कृष्णेची गटारगंगा झाल्याचे पुरावे असतानादेखील कारवाई होत नसल्यामुळे सुधार समितीचे प्रा. आर. बी. शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. सर्व पुरावे, कागदपत्रे गोळा करून त्यांनी महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. जलचर आणि नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असताना सुद्धा कोणतीही उपाययोजना का केली जात नाही? अशी विचारणा करून याप्रकरणी नागरिक आणि पर्यावरण हितासाठी हरित  न्यायालयात जाण्याचा इशारा प्रा. शिंदे यांनी दिला आहे. नोटिसीला खुलासा  करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. 

कृष्णा नदी प्रदूषणप्रकरणी महापालिका व प्रदूषण नियंत्रणने महिनाभरात योग्य खुलासा आणि कारवाई केली नाही तर थेट हरित न्यायालयात खटला दाखल करून कारवाईसाठी पाठपुरावा केला जाईल.
- प्रा. आर. बी. शिंदे

Web Title: Sangli News Krishna River Pollution issue