कुपवाडच्या उद्योजकाचे फिल्मी स्टाईलने अपहरण

कुपवाडच्या उद्योजकाचे फिल्मी स्टाईलने अपहरण

कुपवाड - आर्थिक देवाण-घेवाणीमधून कुपवाड एमआयडीसीमधील उद्योजक राजकुमार आप्पासाहेब पाटील (वय ३३, रा. धनगर गल्ली कुपवाड, मूळ गाव कनाळ, ता. अथणी, कर्नाटक) यांचे गुरुवारी (ता. १६) सकाळी दहा वाजता संशयित लक्ष्मण मोरे व त्याच्या साथीदारांनी अपहरण केल्याची तक्रार कुपवाड पोलिसांत दाखल झाली आहे. याची फिर्याद रमेश दादासाहेब पाटील (वय ५५, रा. कुपवाड) यांनी दिली.

दरम्यान, कुपवाड पोलिसांच्या पथकाने थरारक पाठलाग करून कनाळ येथील पाच संशयितांना रात्री उशिरा ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

उद्योजक राजकुमार पाटील यांचा कुपवाड एमआयडीसीजवळ बॉक्‍स पॅकिंग करण्याचा कारखाना आहे. कनाळ येथील लक्ष्मण मोरे याच्याशी आर्थिक देवाण-घेवाणीतून वाद टोकाला गेल्याने संशयित लक्ष्मण मोरे याने चार साथीदारांसह चारचाकी वाहनातून (केए २२ सी ७४७१) पाटील यांचे अपहरण केले. पाटील यांना कनाळ येथील एका लॉजमध्ये डांबून ठेवल्याची माहिती कुपवाड एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिस निरीक्षक अशोक कदम यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रवीण यादव, नितीन मोरे आणि अशोक कोळी यांनी मंगळवारी (ता. २१) कनाळ येथे छापा टाकला. संशयित पाचही जणांना पोलिस आल्याची कुणकुण लागल्याने तेथून त्यांनी पळ काढला. मात्र, कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी थरारक पाठलाग करत पाचही संशयितांना चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

कुपवाड पोलिसांनी नागरिकांचा गमावला विश्‍वास - शरद पाटील
चोरी, गुन्हा, उद्योजकाचे अपहरण, महिलांच्या छेडछाडीसह अनेक तक्रारींबाबत कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून तक्रारदार नागरिकांची योग्य ती दखल घेतली जात नसून याबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी नागरिकांची योग्य दखल न घेणे आणि त्यांच्याबद्दल असंतोष निर्माण होणे म्हणजे कुपवाड पोलिसांनी नागरिकांचा विश्‍वास गमावल्याची टीका माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी केली. शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची बैठक सोसायटीच्या सभागृहात झाली, त्या वेळी ते बोलत होते.

बैठकीस ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, नगरसेवक गजानन मगदूम, मिरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आण्णासाहेब कोरे, रमेश पाटील, सावळाराम सिंदकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप तांबडे, परवेज मुलाणी, अशोक रासकर, बापू तोडकर, माजी उपमहापौर मोहन जाधव, प्रकाश व्हनकडे, गजानन पाटील, शंकर कोकरे, अरुण रूपनर, प्रा. अशोक रास्कर, आकाराम सायमोते, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

मारहाण अन्‌ सुटका
उद्योजक पाटील यांचे फिल्मी स्टाईलने अपहरण केले. त्यांना कनाळ येथील एका लॉजवर डांबून ठेवत बेदम मारहाण केली. जीवावर बेतलेला अपहरणाचा हा डाव उधळून लावत पोलिसांनी उद्योजक राजकुमार पाटील यांची अखेर सुटका केली. फिल्मी स्टाईलने झालेल्या अपहरणात पोलिसांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल तिघा पोलिसांचा सत्कार करत सन्मान केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com