‘लॅपटॉप गोलमाल’ला कोल्हापुरी झटका

‘लॅपटॉप गोलमाल’ला कोल्हापुरी झटका

सांगली - राज्यातील सुमारे साडेबारा हजार तलाठ्यांसाठीच्या लॅपटॉप खरेदीतील आर्थिक गोलमाल प्रकरणी महाराष्ट्र आयटी महामंडळाला पहिला झटका कोल्हापूरने दिला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने खरेदीची ऑर्डर रद्द केली आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार तलाठ्यांसाठीचे लॅपटॉप खरेदी करण्यासाठी भरलेली सव्वा कोटी रुपयांची रक्कम तातडीने परत मागवली आहे. कार्यालयच पुढाकार घेऊन प्रत्येकी ३० हजार रुपयेप्रमाणे लॅपटॉप खरेदी करणार आहेत. या लॅपटॉप आयटी महामंडळाने खरेदी केलेल्या 
लॅपटॉप कंपनीचे, त्याच सुविधा व दर्जाचे असणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाच्या जीईएम मार्केटिंग संकेतस्थळावरून निविदा मागवण्यात आल्या आहेत. प्रत्येक लॅपटॉपमागे किमान २२ हजार रुपये वाचणार आहे. तेथे सुमारे ५२५ लॅपटॉप खरेदी होणार आहेत. 

दरम्यान, लॅपटॉप खरेदीतील गोलमाल गुंडाळण्याचा महामंडळाच्या मनसुब्यांना आज ‘सकाळ’च्या वृत्ताने धक्का बसला. मुंबईत या विभागात आज बैठकांचे फेर सुरू होते. सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांनी लॅपटॉपची रक्कम परत पाठवा, असा पवित्रा घेतला आहे. 

दुसरीकडे सातारा जिल्ह्यात लॅपटॉपचे वाटप झाले आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने लॅपटॉप खरेदीसाठी पैसे जमा केले होते; मात्र तांत्रिक कारणाने ते ऑनलाईन वर्ग झालेले नाहीत. त्यामुळे सोलापूर या फेऱ्यातून बचावले आहे. आता सांगली जिल्ह्याने दाखल झालेले १३८ लॅपटॉप परत घेण्याविषयी पत्र पाठवले आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो आणि लॅपटॉप घेऊन रक्कम परत दिली जाते का, याकडे लक्ष असणार आहे. आयटी महामंडळातील मुंबईतील अधिकाऱ्यांशी ‘सकाळ’ने संपर्क साधला. त्यांनी ‘नंतर बोलू’, असे सांगून तूर्त विषय टाळला.

या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी सांगली दौऱ्यावर आलेल्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना याविषयी छेडले असता माहिती घेऊन बोलतो, असे त्यांनी सांगितले होते. आज पुन्हा त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. ते, लखनौमध्ये एका लग्न सोहळ्यात होते. याविषयी ‘मी स्वतः कळवेन’, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com