मागण्यांशिवाय मुंबई सोडणार नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

मराठा क्रांती मोर्चा बैठक - मुंबई मोर्चानंतर आक्रमक व्हावे

सांगली - मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात ५८ मोर्चे काढूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ९ ऑगस्टचा मोर्चा हा शेवटचा मोर्चा असेल. त्यानंतरचे आंदोलन आक्रमक करा. मूक मोर्चा काढून काही साध्य होत नाही. मुंबई मोर्चावेळी मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, अशी मागणी आज मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत करण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चा बैठक - मुंबई मोर्चानंतर आक्रमक व्हावे

सांगली - मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात ५८ मोर्चे काढूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ९ ऑगस्टचा मोर्चा हा शेवटचा मोर्चा असेल. त्यानंतरचे आंदोलन आक्रमक करा. मूक मोर्चा काढून काही साध्य होत नाही. मुंबई मोर्चावेळी मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, अशी मागणी आज मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत करण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक जाणार आहेत. त्याच्या पूर्वतयारी आणि नियोजनासाठी आज वारणा मंगल कार्यालय येथे बैठक घेतली. या वेळी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून बैठकीस प्रारंभ झाला.  यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

नाशिक येथे झालेल्या राज्य समन्वय समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार जिल्ह्यात नियोजन करण्याचे ठरले. मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते नेण्याचा निर्णय  घेण्यात आला. त्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा, तालुका आणि गावस्तरावर समन्वय समित्या नेमण्यात येणार आहे. गतवर्षी कोपर्डीतील घटनेनंतर राज्यभरात सुमारे ५८ मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आले.  मात्र हे मोर्चे इव्हेंट झाले. समन्वय समितीच्या निर्णयानुसार ९ ऑगस्टचा मोर्चा काढावा. त्यानंतरचे आंदोलन आक्रमक झाले पाहिजे. हा लढा सरकारच्या विरोधात आहे.

मुंबईत एक कोटी मराठ्यांचा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही अशीही मागणी करण्यात आली.  सरकारला एकतर्फी निर्णय न घेता मागण्या मान्य करायला लावू, अशी ग्वाही संयोजकांनी दिली.

मोर्चास येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी वाहन व्यवस्था करण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. सतीश साखळकर यांनी पाच वाहनांची आणि त्यातील कार्यकर्त्यांची जबाबदारी घेण्याचे जाहीर केले. तसेच मोर्चा प्रचंड मोठा होणार असल्याने समाजातील नागरिकांनी दोन-तीन दिवस आधीच मुंबईत जावे, अशा सूचना करण्यात आल्या.

मुंबई मोर्चासाठी महिला मोठ्या संख्येने येतील, त्यामुळे त्यांची स्वतंत्र नावे घ्या, महिलांनी समूहाने यावे, महिलांशी समन्वय समितीचा संपर्क असावा. पक्ष संघटना बाजूला ठेवून या अशी मागणी महिला कार्यकर्त्यांनी  केली. मराठा समाजाच्या नागरिकांनी आपली नोंदणी करण्यासाठी मराठा वेब लिंक सुरू करण्यात आली आहे. www.concepttest.in या वेबसाईटवर  आपली माहिती नोंद करा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी संजय देसाई, डॉ. संजय पाटील, विलास देसाई, श्रीरंग पाटील, रणजित पाटील, ए. डी. पाटील, सतीश साखळकर, रवी खराडे, राहुल पवार, श्रीनिवास पाटील, महेश खराडे, नितीन चव्हाण, काका हलवाई, योगेश पाटील, सर्जेराव पाटील, अशोक पाटील, मनीषा माने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

चर्चेतील मुद्दे -
जिल्हा, तालुका समन्वय समिती नेमणार
तालुका, गावागावात बैठक घेणार
रेल्वेने मोफत जाणार
कार्यकर्ते ट्रॅव्हल्स, मोठ्या वाहनांतून नेणार
देणगी स्वरूपात पैसे मागू नये
समन्वय समितीत प्रत्येक तालुक्‍यातून दहा माणसे

१३ जुलैस कॅंडल मार्च
कोपर्डीतील दुर्दैवी घटनेत बळी गेलेल्या मुलीच्या पहिल्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्ह्यात १३ जुलै रोजी कॅंडल मार्च काढण्यात येणार आहे. सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध गावांत कॅंडल मार्चचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.