इस्लामपुरात प्रेम प्रकरणातून युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

इस्लामपूर -  प्रेम प्रकरणातून येथील सूरज भीमराव जाधव (वय २३, रा. कापूसखेड नाका) या युवकाचा लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून खून झाला. या प्रकरणी संबंधित युवतीच्या चुलत भावासह तिघांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. मारहाणीची घटना गुरुवारी (ता. २८) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली होती. उपचार सुरू असतानाच सूरजचा शनिवारी (ता. ३०) मृत्यू झाला.

इस्लामपूर -  प्रेम प्रकरणातून येथील सूरज भीमराव जाधव (वय २३, रा. कापूसखेड नाका) या युवकाचा लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून खून झाला. या प्रकरणी संबंधित युवतीच्या चुलत भावासह तिघांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. मारहाणीची घटना गुरुवारी (ता. २८) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली होती. उपचार सुरू असतानाच सूरजचा शनिवारी (ता. ३०) मृत्यू झाला.

घटनेमुळे जावडेकर चौक व परिसरात तणावाची स्थिती आहे. तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. संशयितांच्या अटकेसाठी कापूसखेड नाका परिसरातील नागरिकांनी काल इस्लामपूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. नातेवाइकांनी मृतदेह घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला. मारहाण प्रकरणी पोलिसांनी मजहर हुमायून सैदेखान (वय २५), सूरज शमसुद्दिन सैदेखान (२२) व अकीब इलाही मुल्ला (२५, सर्व रा. कापूसखेड नाका) यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सूरजचा भाऊ सुशांत भीमराव जाधवने (२७) पोलिसांत फिर्याद दिली. 

सूरज याचे शेजारीच राहणाऱ्या एका युवतीशी प्रेमसंबंध होते. याची कल्पना युवतीच्या नातेवाइकांनाही होती. गुरुवारी मध्यरात्री सूरज त्या युवतीला भेटून घरी जात असताना युवतीचा चुलत भाऊ मजहर, सूरज व अकीब यांनी त्याला अडविले. एवढ्या रात्री कुठे गेला होतास, अशी विचारणा करीत त्याला बेदम मारहाण केली. लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याने त्याच्या पोटावर, डोक्‍यावर व गुप्तांगावर दुखापत झाली. मारहाण करून तिघेही पळून गेले. मारहाणीत सूरज बेशुद्ध झाल्याने तो रात्रभर रस्त्यावरच पडून होता. सकाळी सातच्या सुमारास ही घटना समजली. त्याचे चुलते अर्जुन जाधव, शेजारी संतोष नलावडे, भीमराव नलावडे यांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांना डॉक्‍टरांकडून घटनेची माहिती मिळूनही गुन्ह्याची तीव्रता लक्षात न आल्याने गुन्हा दाखल नव्हता. शुक्रवारी (ता. २९) सूरजची प्रकृती चिंताजनक बनल्याने पोलिसांनी तातडीने संशयितांवर गुन्हा दाखल करीत मजहर सैदेखान याला ताब्यात घेतले. दुपारी उपचार सुरू असतानाच सूरजचा मृत्यू झाला. डोक्‍यातील दुखापतीने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. सूरज हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करीत होता. त्याच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

मारेकऱ्यांना अटक करा
सूरजच्‍या मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी तेथील नागरिक, महिलांनी एकत्र येऊन पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. नगरसेवक सतीश महाडिक, प्रतिभा शिंदे, मल्हार सेनेचे सागर मलगुंडे यांनी पुढाकार घेतला. पोलिस उपअधीक्षक किशोर काळे यांना निवेदन दिले. त्यानंतर पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे, उपनिरीक्षक अमोल शिंदे यांच्या पथकाने तातडीने कारवाई करून सूरज सैदेखान व अकीब मुल्ला यांनाही ताब्यात घेतले.