पोलिसांपुढे बंद घरे फोडणाऱ्यांचे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

सांगली - शहरात तसेच उपनगरात बंद घरे आणि बंगले फोडण्याचे प्रकार थांबून थांबून घडत आहेत. यापूर्वी दिवसा घरे, बंगले फोडणाऱ्यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पोलिसांच्या गस्तीला सुस्ती आली आहे. तसेच परगावी जाताना काय खबरदारी घ्यावी याबाबत पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही दुर्लक्ष केले जात आहे. याचा परिणाम म्हणून चोरटे सहजपणे बंद घरे, बंगले फोडत आहेत. त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे आहे. 

कुपवाड रस्त्यावरील लक्ष्मी मंदिर परिसरात नुकताच डॉ. पराग हवालदार यांचा बंद फ्लॅट भर दिवसा फोडून चोरट्याने रोकड व दागिने असा चार लाखांचा ऐवज लंपास केला. तसेच विश्रामबागला घर फोडून एलईडी लंपास केला. चोरट्यांनी माधवनगर रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी बंद बंगला फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज लंपास केला. विश्रामबागला बंद घर फोडून 60 हजारांचा ऐवजही लंपास केला. पोलिस दफ्तरी आठवडाभरात नोंद असलेले हे गुन्हे आहेत. बऱ्याचदा किरकोळ चोरीची फिर्याद दिली जात नाही. तसेच काही वेळा कच्च्या नोंदीवर काम भागवले जाते. 

भर दिवसा किंवा रात्री बंद बंगले, घरे, फ्लॅट हेरून फोडण्याचे प्रकार थांबून थांबून घडत आहेत. पोलिस दफ्तरी अद्यापही चोरी, घरफोडीचा तपास प्रलंबित आहे. चोरटे कोणताच पुरावा सोडत नसल्यामुळे त्यांना पकडणे शक्‍य होत नाही. पोलिसांच्या गस्तही सुस्त बनल्याच्या नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यास येतात. उपनगरात पोलिसांची गस्त पोचत नाही. परिणामी त्या भागात गुन्हे घडतात. पोलिसांच्या गस्तीअभावी काही प्रमाणांत गुन्हे घडत असले तरी नागरिकांचा बेजबाबदारपणाही कारणीभूत ठरत आहे. 

घर, बंगला किंवा फ्लॅट बंद करून परगावी जाताना जवळचे पोलिस ठाणे, शेजारील नागरिक यांना कळवून गेले पाहिजे; परंतु तसे होत नाही. सुरक्षा साधनांचा वापर केला जात नाही. दागिने, रोकड बॅंकेतील सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये ठेवली जात नाही. त्याचा परिणाम म्हणून चोरीचे प्रकार घडतात. 

काय खबरदारी घ्याल? 
* परगावी जाताना शेजारी व पोलिसांना कळवा 
* दागिने, रोकड बॅंकेत ठेवून जा 
* सीसीटीव्ही, अलार्म सिस्टीमचा वापर करा 
* दरवाजाचे कडी-कोयंडे स्टीलचे बसवा 

नागरिकांनी दक्षता घ्यावी- 
पोलिस प्रत्येक घरासमोर गस्त घालू शकत नाहीत. सर्व भागांत गस्त सुरू असते. नागरिकांची दक्षतादेखील आवश्‍यक आहे. सुरक्षा साधनांचा वापर करावा. परगावी जाताना दागिने, रोकड बॅंकेत ठेवावी. अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक ठेवावेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत. तसेच इतर आवश्‍यक दक्षताही घ्यावी. 
-राजेंद्र मोरे (पोलिस निरीक्षक, विश्रामबाग).