स्वाभिमानीच्‍या ‘शिट्टी’त खडा कुणाचा?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

डीपीसी निकाल - झाकल्या खुणा, सदाभाऊंवर निशाणा
सांगली - जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत भाजपसह सर्वपक्षीय कडबोळ्याविरुद्ध स्वाभिमानी  शेतकरी संघटनेच्या सुरेखा आडमुठे यांचा विजय वरवर पाहून चालणार नाही. भाजपविरुद्ध दंगा आणि सदाभाऊंविरुद्ध पंगा घेतल्यानंतर खासदार राजू शेट्टींच्या राजकीय वाटचालीतील नव्या समीकरणांची ही नांदी ठरेल. एरवी टोकाची खुन्नस न देणाऱ्या शेट्टींनी दात-ओठ खाऊन भाजपच्या कानात ‘शिट्टी’ वाजवली आहे. मात्र त्यात खडा कुणाचा होता, हे शोधता शोधता दमछाक होणार आहे.

डीपीसी निकाल - झाकल्या खुणा, सदाभाऊंवर निशाणा
सांगली - जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत भाजपसह सर्वपक्षीय कडबोळ्याविरुद्ध स्वाभिमानी  शेतकरी संघटनेच्या सुरेखा आडमुठे यांचा विजय वरवर पाहून चालणार नाही. भाजपविरुद्ध दंगा आणि सदाभाऊंविरुद्ध पंगा घेतल्यानंतर खासदार राजू शेट्टींच्या राजकीय वाटचालीतील नव्या समीकरणांची ही नांदी ठरेल. एरवी टोकाची खुन्नस न देणाऱ्या शेट्टींनी दात-ओठ खाऊन भाजपच्या कानात ‘शिट्टी’ वाजवली आहे. मात्र त्यात खडा कुणाचा होता, हे शोधता शोधता दमछाक होणार आहे.

नियोजन समिती (डीपीसी)ची निवडणूक पहिल्यांदाच लागली, बिनविरोधचे पत्ते पिसले गेले. ते विस्कटले, त्याची पुन्हा जुळवाजुळव झाली... हे करताना जिल्हा परिषदेच्या सत्तेत एक भाग असलेल्या शेट्टींना विचारलेच नाही. ५४ पानातील २ पाने बाजूला काढून ५२ पाने पिसावेत, तसा प्रकार भाजपने केला. शेट्टींनी थेट बंड पुकारले. आधीच भाजपशी पंगा घेतलेला, त्यात सदाभाऊ-शेट्टींनी एकमेकांना बोचकारून रक्तबंबाळ केलेले. प्रकरण जिल्हा परिषदेच्या कारभाऱ्यांनी हलक्‍यात घेतले. शेट्टींनी पहिला हल्ला केला तो भाजपचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशी खडाजंगी करून. त्यानंतर ते नावापुरते नाही तर जिंकण्यासाठी लढले. खासदार निधी आणि जिल्हा परिषद सदस्यांचा नाही म्हटलं तर संबंध येतोच. तो इथे कामी आला, असे शेट्टींनीच कबूल केले. शेट्टी हे कोणत्याही पक्षाला वर्ज्य नाहीत.

पूर्वी राष्ट्रवादीवाले दोन हात दूर राहायचे आणि तेच हळूहळू शेट्टींकडे सरकू लागलेत, हेही यानिमित्ताने दिसले. काँग्रेसकडून इस्लामपूरची विधानसभा लढलेल्या जितेंद्र पाटील यांनी ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची नांदी असल्याची टीका वजा निरीक्षण नोंदवले आहे. त्यांचा रोख शेट्टी, जयंतरावांकडे आहे. पुढचा शोधही तेच घेतील. त्याची वाट पाहावी लागेल. आकडे मात्र तसेच संकेत देत आहेत. सुरेखा जाधव यांना आठ मते द्यायची होती. त्यासाठी  आठ सदस्य ठरले होते. पैकी पाच राष्ट्रवादीचे, तीन  भाजप आघाडीचे होते. आता नेमके पाचजणांनीच आडमुठेंना मते दिली असावीत, असा निष्कर्ष काढायचा का? सबळ कारण म्हणजे, इतर ठिकाणी ठरल्याप्रमाणे  मते दिसताहेत. विशेष म्हणजे, दोन मते आशा पाटील यांना गरज नसताना जास्त दिली गेली आहेत. आता ही दोन मते कुणाची ? त्यात विशाल पाटील गटाच्या दोघांकडे अंगुलीनिर्देश करायला जागा राहते, अशी चर्चा आहे. त्यांचेच विशाल चौगुले हे आडमुठे यांचे सूचक होते. भाजपच्या अजितराव घोरपडे गटाने शंभर टक्के प्रामाणिक काम केल्याचा संग्रामसिंह देशमुख यांचा दावा आहे. अर्थात, भाजपचा दुसरा गट कदाचित तो तपासूनही घेईल. कारण, इथे कुणालाच कुणाचा भरवसा नाय...होता...फुल्ल कॉन्फिडन्स होता...पण पीन लागली ना राव...ही पहिल्यांदा लागलेली नाही. अशा कडबोळ्यांत गाफील राहिल्यानेच दिवंगत मदन पाटील जिल्हा बॅंकेत...शेखर गोरे विधान परिषदेला पराभूत झाले. या साऱ्याचा अभ्यास असताना हे घडले, हेच विशेष. त्यामुळे शिट्टीतला ‘खडा’ कोण हाच संशोधनाचा विषय असेल.

राजू शेट्टींची नाईक यांच्याबद्दल नाराजी 
सुरेखा जाधव पराभूत झाल्या. रयत आघाडीच्या सदस्या. सदाभाऊ खोत व शिवाजीराव नाईक यांच्या समर्थक मानल्या जातात. अर्थात रयत आघाडीचे नेते राजू  शेट्टीच. पण आता शेट्टींचा ‘रयत’शी संबंध आहे का, हे कोडेच आहे. त्यांनी सध्या शिवाजीराव नाईक यांच्याबद्दलही नाराजीचा सूर आळवला आहे. त्यांनी ‘डीपीसी’बद्दल मला विचारलेच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.