पावसाने केले महापालिकेचे वस्त्रहरण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सांगली - एक जोरदार पाऊस झाला की शहरात दाणादाण उडते. ठिकठिकाणी तळी साचतात. नाले ओसंडून वाहतात. दुर्गंधीचे साम्राज्य पसरते. पाठोपाठ रोगराई धावते. रस्त्यांची चाळण होते ती वेगळीच. हे सारे सांगलीकरांच्या पाचवीला पुजल्याने सारेच वैतागले. ठोस उपाययोजनांऐवजी कागदी घोडे नाचविण्यात लोकप्रतिनिधींसह अधिकारी तरबेज आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने महापालिकेच्या कारभाराचे वस्त्रहरण केले. तरीही कारभारी अन्‌ अधिकारी बेजबाबदारपणे वावरतात. नागरिकांचे दुखणे पालिकेला कधी समजणार, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

दोन दिवसांपासून शहरासह परिसरात जोरदार पाऊस होत आहे. शहराची पार वाट लागली आहे. सारे शहर जलमय झाले. सांडपाण्याचा निचरा करणारी व्यवस्था नसल्याने ही गत झाली आहे. आयुक्तांच्या दालनात अनेक बैठका होतात. मात्र, त्यातून ठोस उपाययोजना निघत नाहीत. शहरातील मुख्य रस्त्यांवर आज पाणीच पाणी होते. स्टेशन चौक, झुलेलाल चौक, महापालिकेजवळ गुडघाभर पाणी साचून होते. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली. काही भागात रस्त्यापासून दीड फूट उंचीवर गटारी बांधल्या आहेत. त्याचा उपयोग काय हेही सांगणे कठीण झाले. निकृष्ट दर्जाचे रस्ते पुन्हा उखडले. वारंवार आंदोलने झाली, तरीही प्रशासनाला जाग येत नाही. विश्रामबाग, राजवाडा चौक, महापालिका चौक, स्टेशन चौक, झुलेलाल चौकासह विस्तारित भागात हीच अवस्था आहे. 

गुंठेवारीतील नागरिक तर नरकयातना भोगत आहेत. श्‍यामरावनगरसह अन्य भागात ड्रेनेजच्या खोदाईमुळे सारा परिसर चिखलमय आहे. नागरिकांनी पोटतिडकीने सांगूनही कामात चालढकलपणा केला जातो. शंभर फुटी परिसरातील पाकिजा मशिदीजवळ जुबेर बारगीर यांच्या घराला तर पाण्याने वेढा दिला आहे. महापौर-आयुक्त दौरे करतात, पाहणी करतात, आश्‍वासने देतात. मात्र, पुन्हा "जैसे थे'च अवस्था आहे. महापालिकेच्या बेफिकीरपणामुळे सारेच त्रस्त झाले आहेत.