शेट्टींनी खोलले राजकारणाचे पत्ते

शेट्टींनी खोलले राजकारणाचे पत्ते

इस्लामपूर - खासदार राजू शेट्टी यांची येथील राजारामबापू दूध संघातील सदिच्छा भेट आज आगामी राजकीय समीकरणाची मांडणी करणारी ठरली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील फुटीनंतर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर खासदार शेट्टी यांची ही चाल अपेक्षित असली तरी इतक्‍या आधीच ते आपले पत्ते खुले करतील हे मात्र अपेक्षित नव्हते.

दुपारी खासदारांच्या वाहनांचा ताफा संघाच्या कार्यस्थळावर आला. प्रारंभी उपस्थितांसाठीही धक्का होता. गेल्या दशकभरात खासदार व दूध संघाचे नेते जयंत पाटील यांच्यातील उभा संघर्ष सर्वांनीच अनुभवला आहे. साखर कारखानदार विरुद्धं ऊस उत्पादक असा राजकारणाचा आजवरचा पट आता बहुपदीर होताना दिसत आहे.

शेट्टींच्या पराभवाचे शिवधनुष्य जयंतरावांनी उचलताना त्यांनी स्वतःच्या राष्ट्रवादी पक्षाची जागा त्यांनी काँग्रेसला बहाल करून तिथून कल्लाप्पा आवाडे यांना उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेतला होता, तरीही शेट्टींनी विजय मिळवून जयंतरावांचा पराभव केला होता. त्यानंतरही दोघांमध्ये सतत आरोप प्रत्यारोप सुरूच होते, मात्र संघटनेतील वादानंतर या दोघांमधील थेट आरोपांना खीळ बसली होती. जयंतरावांनी सदाभाऊंना लक्ष्य करताना शेट्टींना सॉफ्ट कॉर्नर दिला होता. 

दरम्यान, शेट्टींची राष्ट्रवादी किंवा काँग्रेसविरोधातील टीकेची धार बोथट झाल्याचे सर्वांनाच जाणवत होते. एकीकडे हातकणंगलेतून सदाभाऊ भाजपचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत यापूर्वीच मिळाले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या दोन नेत्यांमध्येच संघर्ष पेटणार हे उघड असताना त्याची राजकीय मांडणीही आता सुरू झाली आहे. 

दोन दिवसांत पडसाद शक्‍य
शेट्टींची आजची भेट राजकीय मांडणीचाच भाग मानला जात आहे. संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या हस्ते शेट्टींनी यथोचित सत्कार स्वीकारला. याचा अर्थच मुळी त्यांनी जयंतरावांकडूनच हा सत्कार स्वीकारला  आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इस्लामपूर दौऱ्याचे कवीत्व अद्यापही सुरूच आहे. नगराध्यक्ष निशिकांत पाटील व मंत्री सदाभाऊ जयंतरावांनाच  शिंगावर घ्यायच्या तयारीत असताना हा सत्कार आता नव्या कवित्वाला सुरवात करणारा ठरेल यात शंका नाही. येत्या दोन दिवसांत त्याचे पडसाद उमटलेले असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com