सांगली जिल्ह्यात पक्ष सावरण्यासाठी पवार कोणता मंत्र देणार?

बलराज पवार
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

आज सांगलीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार येत आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते नेते, कार्यकर्त्यांना पक्षाचा डोलारा सावरण्यासाठी कोणता कानमंत्र देणार याची उत्सुकता आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता गमावल्यानंतर स्वत: शरद पवार यांनी राज्य पुन्हा पिंजून काढण्यास सुरुवात केली.

सांगली -  एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानावर गेली. राष्ट्रवादीतूनच भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांमुळे कमळचा टक्‍का आता ग्रामीण भागातही वाढला आहे. एक आमदार असताना काँग्रेसही बऱ्यापैकी सावरले आहे. या पार्श्‍वभूमीवर आज सांगलीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार येत आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते नेते, कार्यकर्त्यांना पक्षाचा डोलारा सावरण्यासाठी कोणता कानमंत्र देणार याची उत्सुकता आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता गमावल्यानंतर स्वत: शरद पवार यांनी राज्य पुन्हा पिंजून काढण्यास सुरुवात केली. 

सांगली, कोल्हापूर हे त्यांचे बालेकिल्ले २०१४ च्या निवडणुकीत ढासळल्यानंतर त्यांनी पुन्हा या किल्ल्यांची राजकीय बांधणी करण्यास सुरुवात केली. त्यासाठी ते स्वत: संधी मिळेल तेव्हा सांगलीत येत राहिले आहेत. त्यातच आर. आर. पाटील यांच्या अकाली निधनामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली. ती अद्याप भरून निघालेली नाही. त्यामुळे तासगावात नगरपालिकेबरोबरच आता ग्रामपंचायतींवरही भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादीला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने तुलनेने चांगली उसळी मारली. मात्र, राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानावर फेकली गेली. हे अपयश ठळकपणे दिसून येत आहे.

माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील राज्याचे नेतृत्व करत असताना जयंत पाटील जिल्हा सांभाळायचे; पण त्यांच्यातही सख्य नव्हते. आर. आर. आबांच्या हयातीत राष्ट्रवादी जिल्ह्यात क्रमांक एकवर होती. त्यांच्यानंतर तासगाव, कवठेमहांकाळमधील त्यांचा गटही आज अस्ताव्यस्त झाला आहे. आमदार जयंत पाटील यांच्याकडे आर. आर. आबांच्या मतदार संघाचे पालकत्व होते. पण विरोधकांनी जयंत पाटील यांची वाळवा- इस्लामपुरातच मोठी कोंडी केल्याने त्यांना आधी बालेकिल्ला पहावा लागतो. त्यामुळे तासगावकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांनी तासगावात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत चुणूक दाखवत भाजपची घोडदौड रोखली. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा मोठे अपयश आले.

जयंत पाटील वाळव्यात पुन्हा वर्चस्व स्थापन करण्यात यशस्वी झाले; परंतु जिल्ह्यात दोन आमदार असतानाही पक्षाला अपेक्षित यश मिळालेले नसले तरी विधानसभा व जिल्हा परिषदेच्या तुलनेत परिस्थिती सुधारली आहे. दिग्गजांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीचा हा ढासळता किल्ला सावरण्यासाठी शरद पवार कोणती जादू करतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

कुंडलचे नेते अरुण लाड यांचा उद्या शरद पवारांच्या हस्ते सत्कार होणार आहे. पण, स्वत: अरुण लाड यापूर्वी पदवीधर व त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था  निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्याने पक्षावर नाराजच आहेत. सध्या त्यांची तयारी कडेगाव-पलूसमधून आमदारकीसाठी सुरू असल्याची चर्चा आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर शरद पवार त्यांना कोणता मंत्र देतात, याकडेही लक्ष लागले आहे.

राजकीय वातावरण तापले....
कोल्हापूर जिल्ह्यात कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या कारखान्यासाठी, तर कुंडलला अरुण लाड यांच्या कारखान्यातील गळीत हंगाम आणि सत्कार यांचे निमित्त असले तरी या दोन्ही कार्यक्रमांमुळे दक्षिण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गरम झाले आहे. मध्यावधीच्या चर्चा, भाजपबद्दल नाराजी या पार्श्‍वभूमीवर पवारांनी भाजपच्या व्यासपीठावर जाणे टाळा, असे आदेश दिल्यानेही ‘राष्ट्रवादी’ आक्रमक होण्याचे संकेत आहेत.