शिरसीतील खुनाचे रहस्य उलगडले 

शिरसीतील खुनाचे रहस्य उलगडले 

सांगली - शिरसी (ता. शिराळा) ते भैरववाडी दरम्यानच्या डोंगरावर चक्रभैरव मंदिराच्या गाभाऱ्यासमोर झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. किसन तुकाराम शिंदे (वय 43, रा. कुंडल, ता. पलूस) असे मयताचे नाव असून त्याच्या पत्नीनेच आणखी एकाच्या सहाय्याने त्याचा डोक्‍यात दगड, वीट घालून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयित आरोपी उज्वला शिंदे (वय 27) हिला अटक करण्यात आली असून तिच्या साथीदाराचा शोध सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

चक्रभैरव मंदिराच्या गाभाऱ्यात खून झाल्याची घटना चार दिवसांपुर्वी घडली होती. अमावस्येच्या दिवशी ही घटना उघडकीस आल्याने हा प्रकार नरबळीचा असावा की खून याबाबत संभ्रम होता. मृताच्या शर्टाच्या खिशात पाचवा मैल ते अंकलखोप हे एसटीचे तिकीट सापडल्याने त्या एकाच सुगाव्यावरुन या खुनाचा तपास इस्लामपूरचे उपअधीक्षक किशोर काळे आणि शिराळ्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील डोंगरे पोलिसांनी शिताफीने केला. त्यावरुन कुंडल परिसरात शोध घेऊन मयताची ओळख पटवण्यात आली. 

अधीक्षक श्री. शिंदे म्हणाले, "" ही घटना नरबळीचा असल्याचा संशय होता. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती पाहता तो खून असावा असा आमचा अंदाज होता. तपासानंतर हा नियोजित कट करुन खून केला असल्याचे निष्पन्न झाले. किसन शिंदे हा पत्नीवर संशय घेत होता. त्यातून तिला मारहाण करत होता. या छळाला कंटाळून तिने एका ओळखीच्या व्यक्तीच्या सहकार्याने पतीचा चक्रभैरव मंदिरात नेऊन मारले.'' 

ते म्हणाले,""घटनेदिवशी परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली असता चक्रभैरव मंदिर हे महादेवाच आहे. तेथे गोड नैवेद्य असतो. श्रावण महिन्यात पालखी निघते. अशी माहिती मिळाल्यावरुन या ठिकाणी नरबळीचा प्रकार नसल्याची शक्‍यता बळावली. त्या दिशेने तपास केला.

सुमारे महिनाभरापासून पत्नी आणि दुसरा संशयित आरोपी या खुनाचा कट करत होते. पती पत्नीमध्ये सतत भांडणे होतात, वाद होतात. त्यामुळे देवाचं काही आहे का बघायचं आहे असे सांगून किसन शिंदेला त्याची पत्नी आणि दुसऱ्या संशयित आरोपीने सोबत येण्यास तयार केले. त्यानुसार शुक्रवारी (ता. 17) दुपारी किसन शिंदेला अंकलखोपला बोलवले. दुसरा आरोपी तेथे आला. ते मोटरसायकलवरुन पुढे शिराळ्याकडे गेले. चक्रभैरव मंदिर निर्जनस्थळी आहे. मंदिराचे जीर्णोध्दाराचे काम सुरु आहे. मात्र रात्रीच्या वेळेस ते तेथे पोचले. त्यावेळी तेथे कुणी नव्हते. याचा फायदा घेऊन किसन शिंदेचा डोक्‍यात दगड आणि वीट घालून खून केला.'' 

अधीक्षक शिंदे म्हणाले, "" या घटनेतील दुसरा सशंयित आरोपी अद्याप सापडलेला नाही. तो सापडल्यानंतर या खुनाचा कट नेमका कसा रचला? चक्रभैरव मंदिराची निवड का केली? या खुनामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? आदी प्रश्‍नांची उत्तरे मिळतील.'' 

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक राजन माने, उपअधीक्षक किशोर काळे, शिराळ्याचे सहायक निरीक्षक स्वप्नील डोंगरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com